fbpx

तुरीवरील शेंगा अळी नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

पुणे  : सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे पतंग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. शेतकऱ्यांनी या किडींवर वेळीच उपाययोजना करावी, असे आवाहन कृषि सह संचालक (विस्तार व प्रशिक्षण) पुणे डॉ. तुकाराम मोटे यांनी केले आहे.

काही ठिकाणी अळीने तुरीवरील कळ्या, फुले व शेंगा फस्त करण्यास सुरुवात केली आहे. या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास ७० टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते. सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था व प्रथम अवस्थेतील अळी असल्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच उपाय योजना केल्यास कमी खर्चात किडींचे नियंत्रण होऊ शकते.

शेतकऱ्यांनी पाने व फुलांची जाळी करणारी अळीची प्रादुर्भावग्रस्त जाळी गोळा करून अळीराहीत नष्ट करून शेंगा पोखरणारी अळीच्या मोठ्या अळ्या हाताने वेचून त्यांचा नायनाट करावा. तूर पिक कळी लागण्याच्या अवस्थेत आल्यापासून एकरी २ कामगंध सापळे (फेरोमोन ट्रॅप) पिकाच्या वर एक फूट उंचीवर लावावेत व निरिक्षण करावे.

शेतामध्ये पक्षी बसण्यासाठी पिकाच्या किमान एक ते दोन फूट उंचीवर पक्षी थांबे हेक्टरी ५० ते ६० ठिकाणी उभारावेत. पिक कळी अवस्थेत असतांना निंबोळी अर्क ५ टक्केची किंवा अझेंडीरॅक्टिन ३०० पीपीएम ५ मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.अळी प्रथम व द्वितीय अवस्थेत असताना एच.ए.एन.पी.व्ही. विषाणूची ५ मिली १० लिटर पाण्यातून संध्याकाळच्या वेळेला फवारणी करावी.

किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर आढळून आल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५, एसजी ४.४ ग्रॅम किंवा फ्ल्युबेन्डामाईड ३९.३५ एससी २ मिली किंवा क्लोरेनट्रीनीलीप्रोल १८.५ एससी ३ मिली किंवा क्लोरॅनट्रीनीलीप्रोल ९.३ + लॅमडा साहॅलोथ्रीन ४.६ झेडसी ४ मिली यापैकी एका कीटकनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मारुका इंडोक्झाकार्ब १४.५ एससी ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीटकनाशकाचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी मात्रा तीन पट वापरावी. शेतात किटकनाशकांचा वापर करतांना हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा व सुरक्षिततेची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहनही कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: