स्वामी वरदानंद भारती जनशताब्दी महोत्सवानिमित्त ज्ञान शिबिराचे पुण्यात आयोजन
पुणे : संतकवी दासगणू महाराज यांचे उत्तराधिकारी शिष्य, थोर तत्वचिंतक, विचारवंत, प्रखर राष्ट्रभक्त, सुप्रसिद्ध कीर्तनकार, स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे प्राचार्य अनंत दामोदर आठवले) स्वामी वरदानंद भारती यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत पुण्यात येत्या १६ ते १८ डिसेंबर दरम्यान ज्ञान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्री राधा दामोदर प्रतिष्ठान, संत विद्या प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शिबीर टिळक रस्त्यावरील रंगदर्शन सभागृह या ठिकाणी पार पडेल. शिबीराची वेळ ही सकाळी ७.३० ते सायं ८ पर्यंत असून ते सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.
वे.शा.सं.विश्वासशास्त्री घोडजकर, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, कल्याणी नामजोशी यांची प्रवचने, स्वामी गोविंददेवगिरी, प्रदीप कुरुलकर, ब्रिगेडियर हेमंत महाजन (सेवानिवृत्त) यांची व्याख्याने यावेळी होतील. शिवाय सुमेधाताई चिथडे, ले.जन. (सेवानिवृत्त) राजेंद्र निंभोरकर या मान्यवरांशी प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ हे संवाद साधतील. शिवाय माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, चाणक्य मंडळ परिवाराचे डॉ. अविनाश धर्माधिकारी या मान्यवरांचे मार्गदर्शन देखील उपस्थितांना लाभणार आहे. शिबिरामध्ये विलास रेणापूरकर, विक्रम नांदेडकर व महेश अनंत आठवले यांची कीर्तने देखील होणार आहेत.
याबरोबरच दिनांक २४ व २५ डिसेंबर रोजी श्री क्षेत्र गोरठे, नांदेड येथे युवा शिबिराचे आयोजन करण्यात आले असून श्री स्वामी वरदानंद भारती जन्मशताब्दी सांगता समारोह १७ ते २१ जानेवारी २०२३ दरम्यान नांदेड येथील स्वयंवर मंगल कार्यालयात साजरा होईल.
