fbpx

पालकांनो, मुलांचे प्रशिक्षक होऊ नका ! पी. गोपीचंद यांचा सल्ला

पुणे : ‘पालकांनो, तुम्ही मुलांचे चाहते व्हा. मुलांचे प्रशिक्षक बनण्याचा प्रयत्न करू नका. त्यांच्या प्रशिक्षकांना त्यांचे काम करू द्या,’ असा सल्ला भारताचे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पी. गोपीचंद यांनी पालकांना दिला. खेळात हार किंवा जीत महत्त्वाची नसते, तर खेळाला सुरुवात करणारा प्रत्येक जण चॅम्पियन असतो. एक खेळ तुम्हाला खूप काही शिकवित असतो, असे सांगून त्यांनी मुलांना खेळाचे महत्त्व पटवून दिले.

निमित्त होते, पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने ८४ व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या काउंटडाउनचे आणि मॅस्कॉट अनावरण कार्यक्रमाचे. नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. ८४वी राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा पुढील वर्षी फेब्रुवारीत पुण्यात होणार आहे. त्याला आता ७५ दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या वेळी कार्यक्रमाला बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे खजिनदार आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन अध्यक्ष अरुण लखानी, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंग, विलू पूनावाला फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जसविंदर नारंग, अण्णासाहेब नातू, पीडीएमबीएचे सचिव रणजीत नातू आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयुष आदे, शरयू रांजणे, यश्वी पटेल, सचेत त्रिपाठी, आरती चौगुले, साद धर्माधिकारी या खेळाडूंचा आणि अजित कुंभार, नरेंद्र पाटील या प्रशिक्षकांचा गौरव करण्यात आला. सत्कार करण्यात आलेले खेळाडू पीसीएमसीचे रहिवासी किंवा पीसीएमसीमध्ये खेळतात.

मुले लहान असल्याने पालक त्यांच्याबाबत फार ढवळाढवळ करतात. या पार्श्वभूमीवर बोलताना गोपीचंद म्हणाले, ‘खेळाडूंनी हार-जीत याचा विचारच करता कामा नये. तुम्ही जिंका किंवा हरा, तुम्ही चॅम्पियन आहात, हे विसरू नका. त्यामुळे केवळ चॅम्पियन होण्यासाठी खेळू नका. कारण खेळात एकच विजेता होऊ शकतो. पराभूत झाल्यांचे काय, असा विचार करू नका. एक खेळ तुम्हाला खूप काही शिकवित असतो. तुमच्यात संघ भावना निर्माण होते, शिस्त लागते. विशेष म्हणजे सार्वजनिक ठिकाणी झालेला पराभव तुम्हाला पचवता येतो. त्यातून शिकून जेव्हा तुम्ही पुन्हा विजेते होतात, तेव्हा एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. हा धडा आयुष्यभर उपयोगी पडतो.’ खरे तर हल्ली लोकांना पराभवाची भीती वाटते. याला कारण म्हणजे त्यांनी लहानपणापासून कधी पराभवाचा सामनाच केलेला नसतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

आपल्याकडे गुणवान खेळाडू आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण का कमी पडतो, यावर बोलताना त्यांनी ‘सिस्टिम’ला दोषी ठरविले. ते म्हणाले, ‘मागील काही काळात आपण खूप चांगले खेळाडू घडविले. त्यांना पुरेशा सुविधा दिल्या. पैशांची गुंतवणूक केली. सर्वांकडून त्यांना पाठिंबा मिळत आहे. म्हणूनच आपण ऑलिम्पिक, आशियाई, जागतिक स्पर्धेत पदक मिळवित आहोत. मात्र, तरीही ‘सिस्टिम’चा अभाव जाणवित आहे. ‘खूप सारे पराभव, खूप साऱ्या दुखापती, खूप साऱ्या शस्त्रक्रिया, खूप सारे चढ-उतार यातून एक बाळ नेहमीच माझ्यात जिवंत राहिले. तुम्ही खूप वेळा पराभूत व्हाल, धडपडाल. मात्र, खेळावरील प्रेम कायम ठेवा,’ असेही गोपीचंद म्हणाले. आयुष्यात तुम्हाला आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी पाठिंबा महत्त्वाचा असतो. अशा वेळी प्रशिक्षकांचा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो, असेही ते म्हणाले.

या वेळी त्यांनी पुण्यातील आठवणींनाही उजाळा दिला. पुण्यात झालेली दुखापत आणि त्यांनंतर मिळविलेले विजेतेपद याबाबत सांगून पुण्यातील यश कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट असल्याचेही ते म्हणाले. त्याचबरोबर पुण्यात २५ वर्षांनी राष्ट्रीय स्पर्धा होत असल्याबद्दल त्यांनी पीडीएमबीएचे कौतुक केले. रणजित नातू, गिरीश नातू, मंजुषा असे अनेक जणांच्या आपल्या यशात वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित नातू यांनी केले, तर राजीव बाग यांनी आभार मानले.

रणजीत नातू म्हणाले, मॅस्काॅटचे नाव वल्ली हे असून महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरूचे व्यंगचित्र रुप आहे. वल्ली हे नाव पु.ल.देशपांडे यांच्या व्यक्‍ती आणि वल्ली या पुस्तकावरून प्रेरित आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: