fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

भाजपच्या बेभान, बेताल नेत्यांना वठणीवर आणावे लागेल – आमदार बाळासाहेब थोरात


पुणे : “गेल्या काही वर्षात लोकशाही, राज्यघटना आणि महापुरुषांवर सातत्याने आघात होत आहेत. लोकशाहीचे मूल्ये, तत्वांना पायदळी तुडवले जात आहे. समाजात द्वेष पसरवून अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकशाहीचे, राज्यघटनेचे संरक्षण करण्यासाठी विद्यार्थी, तरुणांसाठी राज्यघटनेच्या मूल्यांवर, तत्वांवर शिबिरे घेऊन जागृती करायला हवी,” असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. भारतीय जनता पार्टीचे नेते बेभान झाले असून, त्यांना वठणीवर आणण्यासाठी निवडणुकीतून उत्तर देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजिलेल्या १८ व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचा समारोप बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झाला. काँग्रेस भवनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे संयोजक व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी होते. यावेळी माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, गटनेते आबा बागुल, दत्ता बहिरट, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, माजी नगरसेवक रविंद्र धंगेकर,अविनाश बागवे, चंदुशेठ कदम, लता राजगुरू, मनीष आनंद, सुजाता शेट्टी, रफिक शेख, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष कैलास कदम, रजनी त्रिभुवन, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल सिरसाट, भूषण रानभरे, शिवा मंत्री, कैलास गायकवाड, प्रवीण करपे, विजय खळदकर, रमेश सोनकांबळे, सतीश पवार, रमेश सकट, राजेंद्र भुतडा, अजित जाधव, सुनील धाडगे, चंद्रशेखर कपोते, रतनगिरी शिलार, प्रशांत सुरसे, रामदास मारणे, भरत सुराणा, बाळासाहेब अमराळे, भीमराव पाटोळे, बाळासाहेब मारणे, भगवान धुमाळ, ऍड. शब्बीर खान, सीमा सावंत, स्वाती शिंदे, प्राची दुधाने, रमेश पवळे, किशोर मारणे, रमेश अय्यर, चेतन अगरवाल, जया किराड, गौरव बोराडे, कान्होजी जेधे, अजय पाटील, अस्लम बागवान, निलेश बोराटे, द. सु. पोळेकर, रेखाताई घलोत, अनुसया गायकवाड, साहिल केदारी, विशाल मलके, श्रीकृष्ण बराटे आदी उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले, “सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ‘युपीए’ सरकारने सामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले. मुक्त अर्थव्यवस्थेला चालना दिली. माहिती अधिकार, शिक्षणाचा अधिकार, अन्न सुरक्षा योजना, रोजगार हमी योजना अशा लोकोपयोगी निर्णय घेतले गेले. त्यांच्या या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न मोहन जोशी या सप्ताहाद्वारे करत आहेत. सलग १८ वर्षे हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्याचे काम केवळ मोहन जोशी करू शकतात. भारत जोडो यात्रेला ते माझ्याबरोबर सहसमन्वयक म्हणून काम पाहत होते. त्यांचे काम एखाद्या लॅपटॉपप्रमाणे आहे. सगळ्या गोष्टींच्या बाबतीत ते अपडेट असतात. पक्षासाठी एकनिष्ठ व कर्तव्य भावनेने करत असलेल्या मोहन जोशी यांचे कार्य कौतुकास्पद आहे.”

“आज देशात वेगळी परिस्थिती आहे. नोटबंदी, जीएसटीसारखे चुकीचे निर्णय लादले गेले. त्यातून महागाई वाढत आहे. स्वायत्त संस्थांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. महाराष्ट्राची सातत्याने अवहेलना सुरु आहे. प्रकल्प गुजरातला जाताहेत, कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज दडपशाहीची भाषा वापरात आहेत. राज्यातील सरकार, मुख्यमंत्री त्यावर बोलत नाही. याउलट छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर यांच्यासह इतर महापुरुषांचा अवमान करण्याची चढाओढ भाजप त्यांच्या नेत्यांमध्ये लागल्याचे दिसते. त्यामुळे बेताल आणि बेभान वागणाऱ्या भाजपचा बुरखा फाडून खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचे काम आपल्याला करावे लागेल,” असे बाळासाहेब थोरात यांनी नमूद केले.

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, “राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. देशासाठी कठीण असणाऱ्या या कालखंडात राहुल गांधी पायी चालत महागाई, बेरोजगारी, द्वेषभावना याला वाचा फोडत आहेत. सामान्यांचा, शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्याचे काम या यात्रेतून होत आहे. हजारोंच्या संख्येने लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे. एका चांगल्या हेतूने देशहितासाठी निघालेल्या राहुल गांधींच्या यात्रेमुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. देशवासियांना आशेचा किरण दाखवण्याचे काम या यात्रेने केले आहे. गुजरातमध्ये भाजपाला चांगल्या जागा मिळाल्या असल्या, तरी त्यांचा नैतिक पराभव तिथे झाला आहे. आप, एमआयएम पक्षाने काँग्रेसची मते खाल्ल्याने भाजपाला गुजरातमध्ये यश मिळाले. मात्र हिमाचलमध्ये काँग्रेस आणि दिल्लीमध्ये आप पक्षाला मिळालेला वीज भाजपाला जनतेने दाखवलेला लाल कंदील आहे,”

मोहन जोशी म्हणजे, “श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून २ ते ९ डिसेंबर या कालावधीत हा अठरावा सप्ताह उत्साहात साजरा झाला. शहराच्या विविध भागात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले. आरोग्य शिबिरे, शालेय साहित्याचे वाटप, शिष्यवृत्तीचे वाटप, जनजागृतीचे कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी यंदा हा सप्ताह एका वेगळ्या उंचीवर गेला आहे.”

आबा बागुल, कैलास कदम यांनीही मनोगते व्यक्त केली. वीरेंद्र किराड यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र धंगेकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading