fbpx

पुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन

पुणे : भारत तसेच जगभरातील ५० हून अधिक ब्रँड’ने तयार केलेले उच्च प्रतीचे आणि विविध प्रकारातील २००० हून अधिक पेनांचे प्रदर्शन, उच्च दर्जाची शाई, पेन ठेवण्यासाठीचे खास पेनकेस…त्याचबरोबर ऐतिहासिक महत्व असणारे विविध लेखन साहित्य…अशा विविध गोष्टी एकाच छताखाली अनुभविण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. निमित्त आहे ६ व्या आंतराष्ट्रीय फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे.
रायटिंग वंडर्स’तर्फे १० आणि ११ डिसेंबर रोजी सेनापती बापट रस्ता येथील हॉटेल जें. डब्ल्यू मेरीएट येथे दोन दिवसीय आंतराष्ट्रीय फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टीव्हल’चे उदघाटन १० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता अमेरिकेतील शेफर पेन’चे प्रमुख निखील रंजन यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते माजी राष्ट्रपती भारतरत्न ‘डॉ. ए. पी.जे अब्दुल कलाम सिग्नेचर फाउंटन पेन’ प्रदर्शित केला जाणार आहे.

या फेस्टिव्हल बाबत माहिती देताना फेस्टीव्हलचे मुख्य संयोजक सुरेंद्र करमचंदानी म्हणाले, “ पुण्यातील पेन’च्या चाहत्यांना जगभरातील उच्च प्रतीचे पेन पाहता यावे, यासाठी गेली ६ वर्षे आम्ही या फेस्टीव्हल’चे आयोजन करत आहोत. यंदा फेस्टीव्हलमध्ये लॅमी, पायलट, ऑरोरा, अरिस्ता, क्रॉस, बीना, कोंक्लीन, डिप्लोमट, क्लिक, पार्कर, पु.ल. देशपांडे सिग्नेचर पेन, खास लहान मुलांसाठी ‘चिंटू’ पेन अशा विविध ब्रँड’चे फाउंटन पेन त्याचबरोबर रोलर पेन, मॅकेनाइज्ड पेन्सिल्स पहायला मिळणार आहे.’’

फेस्टीव्हलमधील इतर उपक्रमाबाबत माहिती देताना करमचंदानी म्हणाले,“ या फेस्टीव्हलमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पटना येथील पेन संग्राहक युसुफ मन्सूर, पेनचे चाहते आणि वास्तुविशारद यशवंत पिटकर, विंटेज पेन’चे संग्राहक जितेंद्र जैन हे यावेळी नागरीकांशी संवाद साधतील. बुलाढाणा येथील हस्ताक्षार कलाकार गोपाल वाकोडे हे मराठीतून विविध प्रकारे स्वाक्षरी  करण्याचे प्रात्यक्षिक दाखवतील. तर मुंबई येथील आनंद हे पेन दुरुस्तीचे प्रात्यक्षिक सादर करत, त्याबाबत मार्गदर्शन करतील. सिंबायोसिस महाविद्यालयाच्या डिजाइन विभागाचे प्रमुख मनोहर देसाई यांनी संकलित केलेल्या दुर्मिळ स्वरूपातील ऐतिहासिक लेखन साहित्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

या महोत्सवासाठी प्रवेश विनाशुल्क असणार आहे.  या दोन दिवसीय प्रदर्शनात लकी ड्रॉ’च्या माध्यमातून पाच अभ्यागतांना ‘प्रीमियम’पेन भेट म्हणून दिला जाईल. तसेच महोत्सवास भेट देणाऱ्या प्रत्येक २५ व्या शालेय विद्यार्थ्याला एक ‘चिंटू’ पेन भेट दिला जाणार असल्याचेही करमचंदानी यांनी सांगितले.

‘डॉ. ए. पी.जे अब्दुल कलाम सिग्नेचर फाउंटन पेन’बद्दल : या पेनचे वैशिष्ट्य म्हणजे या पेनाच्या टोपणावर भारतरत्न डॉ. ए. पी.जे अब्दुल कलाम यांची अधिकृत स्वाक्षरी कोरलेली आहे. तसेच त्यांचे देशाप्रती असलेले प्रेम लक्षात घेत, पेन’च्या नीबवर ‘आय लव्ह इंडिया’ असे लिहिण्यात आले आहे. वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेल्या या पेनवरील स्वाक्षरीबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रत्येक पेन’ला एक क्रमांक देण्यात आला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: