fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कोकणातील तरूणांना कोकणातच रोजगार उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोकण भूमी प्रतिष्ठानच्या ‘मी मुंबई अभियान’ अंतर्गत ‘स्वराज्य भूमी कोकण महोत्सवा’चे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, कालिदास कोळंबकर, संजय शिरसाठ, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, आयोजक संजय यादवराव आदी उपस्थित होते. नेस्को सेंटर, गोरेगाव येथे आयोजित हा महोत्सव चार दिवस चालणार आहे.

निसर्गसमृद्ध कोकणाला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा हा महोत्सव असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “या महोत्सवाच्या माध्यमातून कोकणच्या विकासाला दिशा आणि गती देण्याचे काम केले जात आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणात पर्यटनाच्या माध्यमातून विकासाची मोठी संधी उपलब्ध आहे. काजू, आंबा, मत्स्यव्यवसाय यांच्यासह स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतील अशा उद्योगांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. कोकणचे वैभव जपणे सर्वांचे कर्तव्य आहे. हे लक्षात घेऊनच कोकणासाठी विविध पर्यावरणपूरक योजना, प्रकल्प, उपक्रमांना चालना देण्यात येणार आहे.”

लहरी हवामानामुळे कोकण किनारपट्टीला मोठे नुकसान सोसावे लागले आहे. त्यातून सावरण्याचे बळ देण्याबरोबरच स्थानिक उद्योजकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले. वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचेही ते म्हणाले. तरूणांना रोजगार उपलब्ध करून कोकणचा सर्वांगीण विकास करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

कोकणाला विकासाच्या पुढच्या टप्प्यात नेणार – उपमुख्यमंत्री फडणवीस

कोकण ही नररत्नांची खाण आहे. स्वराज्य भूमी कोकण महोत्सवाच्या माध्यमातून कोकणच्या कला, संस्कृती, वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृतीचे दर्शन होत असून येत्या काळात अधिक चांगल्या आणि पर्यावरणपूरक योजना राबवून कोकणाला विकासाच्या पुढच्या टप्प्यात नेणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

“कोकणातला आंबा अधिक गोड की माणूस” असा प्रश्न पडतो अशा शब्दात कोकणी माणसाच्या सरळ स्वभावाचे कौतुक करून श्री.फडणवीस म्हणाले, “बंदरे, मासेमारी, विविध उद्योग, पर्यटन विकासासह स्थानिकांचे जीवनमान उंचावण्याचा शासनाचा निर्धार आहे” हा महोत्सव म्हणजे कोकणच्या समृद्धी आणि विकासासाठी आवश्यक व्यक्तींचे एकत्रित संमेलन असून राज्य शासन कोकणाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

काजूसारख्या उत्पादनात कोकणची अर्थव्यवस्था बदलण्याची क्षमता आहे. त्याचप्रमाणे नारळ, मत्स्यपालन, आंबा प्रक्रिया, पर्यटन, वन उत्पादने असे विविध उद्योग हे कोकणचे वैभव असून प्रत्येक जिल्ह्याची गरज ओळखून त्या उद्योगांना चालना देण्याची आवश्यकता असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नमूद केले.

प्रारंभी महोत्सवाचे संयोजक आमदार प्रवीण दरेकर तसेच स्वागताध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे, झाशीच्या राणीचे वंशज राजू नेवाळकर यांच्यासह कोकणच्या विकासात योगदान देणाऱ्या विविध उद्योजकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading