पी एम शहा फाउंडेशनतर्फे ११ व्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन
पुणे : पी एम शहा फाउंडेशनतर्फे ९ आणि १० डिसेंबर रोजी ११ व्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव विधी महाविद्यालय रस्ता येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) येथे होणार आहे, महोत्सवाची वेळ पहिल्या दिवशी दुपारी २ ते सायंकाळी ६ असून, दुसऱ्या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी असेल. या महोत्सवासाठी प्रवेश विनाशुल्क असून, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर प्रवेश दिला जाईल.
या महोत्सवासाठी जगभरातून १३० हून अधिक चित्रपटांनी आपला सहभाग नोंदविला होता. त्यापैकी ३१ चित्रपटांची महोत्सवासाठी निवड करण्यात आली असून, मानसिक आरोग्य, महिलांचे आरोग्य, पर्यावरणीय आरोग्य, बालकांचे शोषण आणि आरोग्य, आरोग्याकडे दुर्लक्ष आणि आरोग्य संसाधनांचा आभाव, अवयव दान, व्यसन, घरगुती हिंसाचार अशा विविध विषयांवरील चित्रपट या महोत्सवात पहायला मिळणार आहेत. या चित्रपटांची निवड व परीक्षण आरोग्यसुविधा क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. लीना बोरुडे, चित्रपट निर्माते विनय जवळगीकर आणि शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्या अनुजा देवधर यांच्या समितीने केले आहे.
या महोत्सवाबाबत माहिती देताना महोत्सवाचे संचालक अॅड.चेतन गांधी म्हणाले, “ आपल्याकडे आजही आरोग्य हा सर्वात दुर्लक्षित विषय आहे. २००६ साली फाउंडेशनची स्थापना झाली. तेव्हापासून आरोग्यविषयक जनजागृतीसाठी आम्ही काम करत आहोत. चित्रपट हा तरुणांचा अतिशय आवडीचा विषय आहे. त्यामुळे या माध्यमातून तरुणांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्याच्या हेतूने महोत्सव आयोजित करण्याची संकल्पना पुढे आली. गेली दहा वर्षे आम्ही या महोत्सवाचे आयोजन करत असून, यामाध्यमातून विविध विषयांवरील चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले आहे. यंदा महोत्सवाचे विशेष वर्ष असल्याने आम्ही सर्वांकष विषय असलेला महोत्सव आयोजित केला आहे. आरोग्य आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा दरवर्षी प्रेक्षक म्हणून मोठ्या प्रमाणात सहभाग हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरते. ’’
त्वचेची स्वच्छता या विषयावर आधारित ‘रेखा’ हा या महोत्सवातील उदघाटनाचा चित्रपट असणार आहे. महोत्सवाचा समारोप १० डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता अभिनेता ऋषीकेश जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी उत्कृष्ट माहितीपट आणि लघुचित्रपट यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिकाने सन्मानित करण्यात येईल. सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.
