जी २० परिषदे साठी पुणे महापालिका सज्ज
पुणे : पुढीलवर्षी जानेवारीमध्ये जी २० परिषदेच्या पुणे शहरात होणार्या बैठकींच्या तयारीसाठी पुणे महापालिकेने कंबर कसली आहे.राज्याच्या अप्पर मुख्य सचिवांनी काल या तयारीचा आढावा घेतला. या बैठकीच्या अनुषंगाने शहरातील सुशोभिकरणासाठी महापालिका उद्योजक आणि बँकांची देखिल मदत घेणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
पुढीलवर्षीच्या जी २० परिषदेचे यजमान पद भारताकडे आहे. याअंतर्गत पुण्यातही जानेवारी आणि जूनमध्ये या परिषदेच्या तीन बैठका होणार आहेत. या बैठकीसाठी विविध १०० हून अधिक देशांचे प्रतिनिधी पुण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहराचा मेकओव्हर करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रयत्नशील आहे. या पार्श्वभुमीवर पुण्यातील ६० चौक आणि आयलँडचे सीएसआरच्या माध्यमातून ब्युटीफिकेशन करण्यात येणार असून ५२ ठीकाणी कामेही सुरू झाली आहेत. यासोबतच पुढील काही दिवसांत सुशोभिकरणाच्या कामासाठी शहरातील उद्योजक आणि मोठ्या बँकांच्या पदाधिकार्यांची देखिल बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती विक्रम कुमार यांनी दिली.
विक्रम कुमार यांनी सांगितले, की यानिमित्ताने ऐतिहासिक शनिवार वाड्यातील लाईट ऍन्ड साउंड शोचे नूतनीकरण करण्यात आले आहे. तसेच १५ जानेवारीपर्यंत नदी काठ सुधार योजनेतील पहिल्या टप्प्यातील सॅम्पल स्ट्रेचचे काम पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. नदी काठ सुधार योजनेची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी औंध येथील सयाजीराव गायकवाड भवनमध्ये या योजनेची मॉडेल्स, छायाचित्र तसेच व्हिज्युअल शोचे काम देखिल ३१ डिसेंबरपर्यत पूर्ण करण्यात येईल. यासोबतच परदेशी पाहुण्यांच्या विमानतळ ते बैठकीच्या सेनापती बापट रस्त्यावरील जे.डब्ल्यू. मेरियट या मार्गावरील रस्ते, रस्ते दुभाजक, उद्याने, प्रकाश व्यवस्था याची कामे करण्याच्या दृष्टीने येत्या एक दोन दिवसांत संबधित विभागांच्या प्रमुखांचा संयुक्त पाहाणी दौराही आयोजित करण्यात आला आहे.
