‘अमृत संगीत’ उत्सावात पुणेकरांना घेता येणार उस्ताद जाकीर हुसेन यांच्या तबला वादनाची अनुभूती
उत्सवात रंगणार तबला,सतार व गायनाची जुगलबंदी
पुणे : तब्बल तीन वर्षांनंतर पुण्यात प्रसिद्ध तबलावादक उस्ताद जाकीर हुसेन यांच्या तबला वादनाची प्रत्यक्ष अनुभूती कलारसिकांना घेता येणार आहे. त्याचबरोबर पंडित उल्हास कशाळकर यांचे गायन आणि नीलाद्री कुमार यांचे सतारवादन ऐकण्याची पर्वणी रसिकांना मिळणार आहे. निमित्त आहे ‘सा’ व ‘नी’ सुरसंगीत संस्थेतर्फ आयोजित ‘अमृत संगीत’ उत्सवाचे.
हा कार्यक्रम येत्या 3 डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता डी पी रस्ता येथील पंडित फार्म येथे होणार असून, कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध तबला वादक उस्ताद जाकीर हुसेन, गायक पंडित उल्हास कशाळकर आणि सतारवादक नीलाद्री कुमार हे आपला कलाविष्कार सादर करतील, अशी माहिती ‘सा’ व’ नी’ चे संस्थापक सुरेंद्र मोहिते यांनी दिली.
कार्यक्रमात पहिल्यांदाच उस्ताद जाकीर हुसेन हे पंडित उल्हास कशाळकर यांना गायनाला संगत करणार आहेत, शास्त्रीय संगीत रसिकांना ही ऐतिहासिक संगत म्हणजे एक पर्वणीच असणार आहे. त्याचप्रमाणे सध्याचे तडफदार आणि कसदार सतारवादक नीलाद्री कुमार यांच्यासोबतसुद्धा उस्ताद जाकीर हुसेन यांची जुगलबंदी होणार असल्याने तरुण वर्गासाठी हे मोठे आकर्षण असणार आहे.
हा कार्यक्रम सशुल्क असून, कार्यक्रमाची तिकीटे बुक माय शो या ऑनलाईन व्यासपीठावर तसेच जंगली महाराज रस्ता येथील बालगंधर्व रंगमंदिर, कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि टिळक रस्ता येथील टिळक स्मारक मंदिर येथे उपलब्ध असतील. 3 डिसेंबर रोजी फक्त कार्यक्रम स्थळी तिकीट उपलब्ध असणार आहे.
