अर्बन स्केचर्स पुणे’तर्फे ‘स्केचफेस्ट ०६’ चित्रप्रदर्शनाचे आयोजन
पुणे : अर्बन स्केचर्स पुणे’ तर्फे ‘स्केचफेस्ट ०६’ या अनोख्या चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २ ते ४ डिसेंबर दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत कॅम्प परिसरातील सेंट व्हिन्सेंट हायस्कूल येथे होणार आहे. या प्रदर्शनात प्रथमच मुंबई,बंगळूरू,गोवा, कोल्हापूर याठिकाणी असलेल्या प्रादेशिक स्केचिंग चॅप्टर्सचे कलाकार सहभागी होणार असून, प्रदर्शनात चित्रकलाविषयक कार्यशाळा व प्रात्यक्षिकदेखील होणार आहे.
‘स्केचफेस्ट ०६’ विषयी अधिक माहिती देताना, ग्रुप कमिटीच्या सदस्या आर्किटेक्ट श्रुती उटगीकर म्हणाल्या, “प्रदर्शनाचे हे सहावे वर्ष असून, ‘पुणे हेरिटेज’ या विषयावर रेखाटण्यात आलेल्या ६० कलाकारांच्या सुरेख रेखाटनांबरोबरच अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमांनी परिपूर्ण असा हा कलेचा उत्सव असणार आहे. यामध्ये दररोज सकाळी आणि सायंकाळी ‘स्केच वॉक’ आयोजित केले असून, विविध कार्यशाळा, प्रात्यक्षिक, कला संवाद, चित्र प्रदर्शन व विक्री असा भरगच्च कार्यक्रम यावेळी होणार आहे. पंधरा वर्षाखालील मुलांनी रेखाटलेली चित्रे हे या चित्र प्रदर्शनाचे खास आकर्षण असणार आहे. तसेच अर्बन स्केचिंग चे महत्व आणि त्याची गोडी लहान मुलांमध्ये निर्माण करण्यासाठी शालेय मुलांसाठी ‘स्केचिंग वर्कशॉप’ आयोजित केले आहे. प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे, मात्र कार्यशाळा आणि ‘स्केच वॉक’ उपक्रमांसाठी पूर्वानोंदणी आवश्यक असून, ती सशुल्क असणार आहे. ”
या सोहळ्याच्या उद्घाटन सिंगापूर येथील ‘आंतरराष्ट्रीय अर्बन स्केचर्स’ संस्थेचे उपाध्यक्ष पॅट्रिक ङ यांच्या हस्ते होईल. यावेळी ते उपस्थितांशी कला संवाद साधतील. तसेच, पुणे कँटोन्मेंट बोर्ड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रत पाल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत.
‘अर्बन स्केचर्स पुणे’ ची स्थापना २०१५ साली पुण्याचे प्रथितयश आर्किटेक्ट संजीव जोशी यांनी केली आहे. वय, व्यवसाय, पद इत्यादी कसलेही बंधन नसलेल्या संपूर्णत: हौशी कलाकारांच्या या उत्स्फूर्त गटाची सदस्य संख्या काही हजारांवर पोहोचलेली आहे. गेली सात वर्षे सातत्याने दर रविवारी सकाळी ‘स्केचिंग’ करणा-या या ग्रुप’ला आंतरराष्ट्रीय स्केचिंग जगतामध्ये मान्यता मिळाली आहे.
अशा या आगळ्यावेगळ्या गटाच्या अनोख्या चित्रप्रदर्शनाला नागरिकांनी भेट देऊन त्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
