‘ये शाम कुछ अजीब है’… मधून किशोरदांच्या अजरामर स्वरांच्या आठवणींना उजाळा
पुणे : ये शाम कुछ अजीब है… चिंगारी कोई भड़के… मंज़िलें अपनी जगह हैं रास्ते अपनी जगह… यांसारख्या एकाहून एक सरस किशोर कुमार यांच्या गीतांची सुरेल संध्या रंगली. अगर तुम ना होते… असे म्हणत किशोरदा नसते, ही सूरांची जादू करोडो रसिकांना अनुभवायला मिळाली नसती, असे सांगत त्यांच्या गाण्यांचा निराळा अंदाज रसिकांसमोर कलाकारांनी पेश केला. किशोर कुमार यांचे किस्से, आठवणी आणि गीतांनी जुन्या चित्रपटांच्या सुवर्णकाळाची आठवण करून दिली.
निमित्त होते पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचच्या वतीने ‘ये शाम कुछ अजीब है…’ या कार्यक्रमाचे. लक्ष्मी रस्त्यावरील पूना गेस्ट हाऊस येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गायक विजय केळकर यांसह सचिन धामणे, सतीश पेटारे, सुजित कात्रे, संदीप कोळी, शैलेश घावटे व मयूर पांडे यांनी गीतांचे सादरीकरण केले. तर राहुल डावरे यांनी सॅक्सोफोन वादनातून विविध गीतांचे सादरीकरण केले.
यावेळी इकबाल दरबार, माणिक बजाज, घनश्याम सावंत, श्रीधर कुलकर्णी, नंदकुमार बानगुडे-कोंढाळकर, डॉ.ज्ञानराज चौधरी, डॉ. रूपाली करवा, बाळासाहेब मगर, हर्षद अल्पे, दत्ता थिटे, श्रीकांत खडके, आनंद सराफ, आरती दीक्षित, संजय मरळ, उपेंद्र भट, मोहन शेटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार यांनी व संयोजन समन्वयक अजित कुमठेकर यांनी केले.
आॅल इन वन असलेल्या किशोरदांनी अनेक वर्षे चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. त्यांच्या गायिकीसोबतच अभिनय व मिश्किलतेच्या आठवणी ऐकण्यात रसिक रमले होते. ‘किसका रस्ता देखेए दिल ए सौदाई…’ या गीताच्या सादरीकरणाला श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. रुक जाना नही तू कही हार के… सुरमा मेरा निराला, आँखों में जिसने डाला… या गीतांच्या सादरीकरणातून आणि किस्स्यांमधून हिंदी चित्रपटातील सुवर्णकाळाच्या आठवणी जागविल्या.
