Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

पुण्यातील विद्यार्थ्यांनी जपानमधील शैक्षणिक संधींचा फायदा घ्यावा –  तोशिहिरो कानेको

पहिल्या भारत – जपान शैक्षणिक परिषदेचे आयजेबीसीद्वारे पुण्यात करण्यात आले आयोजन  

पुणे  :  भारत आणि जपान हे दोन्ही प्राचीन देश गेल्या काही शतकांपासून एकमेकांशी जोडले गेले आहेत. औद्योगिक व ऑटोमोबाईल क्षेत्रात देखील ते पूरक काम करीत आहेत. शैक्षणिकदृष्ट्या उच्च दर्जाचे सर्वागीण शिक्षण देण्यासाठी जपान ही आज जगाची पसंती असताना येथे शिक्षण घेणा-या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मात्र केवळ १,४५७ इतकी नगण्य आहे. त्यामुळे पुण्यातील विद्यार्थ्यांनी जपानमधील शैक्षणिक संधींचा फायदा घ्यावा, अशी अपेक्षा कॉन्स्यूलेट जनरल ऑफ जपान इन मुंबईचे मुख्य काउंसिल तोशिहिरो कानेको यांनी व्यक्त केली.

पुण्यातील इंडो जपान बिझनेस काउंसिल अर्थात आयजेबीसी आणि जपान सरकारचे कॉन्स्यूलेट जनरल ऑफ जपान इन मुंबई यांच्या वतीने आयोजित पहिल्या भारत –जपान शैक्षणिक परिषदेचे उद्घाटन तोशिहिरो कानेको यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, फुजित्सूच्या लीड फॉर मॅनेजमेंट अँड लीडरशिप डेव्हल्पमेंट विभागाच्या विनया वैद्य, जपानमधील कियो विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. राजीब शॉ, टोकियो विद्यापीठाचे प्रतिनिधी कजुनोरी ससाकी, आयजेबीसीचे अध्यक्ष सिद्धार्थ देशमुख, उपाध्यक्ष अभिषेक चौधरी, संस्थेच्या उच्च शिक्षण संशोधन प्रकल्पाचे अध्यक्ष सुधीर जैसवाल आदी या वेळी उपस्थित होते.

आज जपानमध्ये ८०७ विद्यापीठे, ३०९ ज्युनिअर महाविद्यालये, ५७ तांत्रिक विद्यालये तर तब्बल ३,०४९ विशेष प्रशिक्षण देणारी विद्यालये आहेत. शिवाय २०२३ च्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमधील १,००० विद्यापिठांमध्ये जपानमधील तब्बल ३८ विद्यापिठांचा समावेश झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये अनेक उच्च शैक्षणिक संधी उपलब्ध आहेत, म्हणूनच नजीकच्या भविष्यात भारत- जपान शैक्षणिक संबंध दृढ होणे काळाजी गरज आहे, असेही कानेको यांनी नमूद केले.  

भारत जपान शैक्षणिक संबंधावर प्रकाश टाकत कानेको म्हणाले, “शैक्षणिक क्षेत्राचा विचार केल्यास २०२१ च्या आकडेवारीनुसार जपानमध्ये शिक्षण घेणा-या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या ही १,४५७ इतकी नगण्य आहे. यामध्ये भाषेचा अडसर ही प्रमुख समस्या असली तरी विद्यार्थ्यांच्या भविष्यातील करियरचा विचार केल्यास भारतीय विद्यार्थ्यांसाठी जपान ही उच्च शिक्षणातील सुवर्णसंधी उपलब्ध आहे.”

इतकेच नव्हे तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया,ब्रिटन, जर्मनी, युक्रेन, न्यूझीलँड आदी देशात शिक्षण घेताना येणा-या खर्चाचा विचार केल्यास जपानमधील सरकारी, खाजगी विद्यापिठांमधील खर्च हा निम्म्य्याहून कमी आहे. शिवाय शिक्षणासाठी अपेक्षित असलेले वातावरण, स्कॉलरशिप आणि अंतराच्या दृष्टीने सोयीस्कर असलेला देश याचा जास्तीत जास्त भारतीय विद्यार्थ्यांनी उपयोग करून  घ्यावा यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे कोनेको यांनी सांगितले.

डॉ. मिलिंद पांडे यांनी भारत व जपान मधील शैक्षणिक संबंध आणखी घनिष्ट व्हावेत, यासाठी सर्वांगीण प्रयत्नांची गरज असल्याचे सांगत नजीकच्या भविष्यात एमआयटी यासाठी प्रयत्नशील असेल अशी ग्वाही दिली. शिवाय भारत-जपान हे माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमोबाईल्स, स्टार्ट अप्स, इनक्युबेशन, अॅक्सिलरेशन आदी क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी पार पाडू शकतील असा विश्वास देखील व्यक्त केला.

जपान एक देश म्हणून त्याची संस्कृती, वारसा जपण्याची कला, खाद्यसंस्कृती, डिझाईन, डिझाईन डेव्हलपमेंट, समाजामध्ये मिसळण्याची कला आदी गोष्टी भारतीयांनी जपानी व्यक्तींकडून शिकण्याची गरज असून हे सर्व शिकविण्यासाठी आयजेबीसी कायम प्रयत्नशील असेल, असा विश्वास सिद्धार्थ देशमुख यांनी व्यक्त केला.

सुधीर जैसवाल यांनी प्रास्ताविक केले तर अभिषेक चौधरी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading