Wednesday, August 26, 2026
Latest NewsPUNE

आदिवासी समाजाने ‘स्व’ चा शोध घ्यावा – लक्ष्मण सिंह मरकाम

पुणे: ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी भारताचा विकास दर जगाच्या तुलनेत २८ टक्के होता तर ब्रिटिश देश सोडून जाताना हा विकासदर १.४ टक्के होता. आदिवासी समाजातील अनेक नायकांनी या इंग्रजांविरुध्द मोठा लढा दिला आहे. या नायकांचे काम पुढे नेत आदिवासी समाजाने स्वतःमध्ये स्वत्वाची जाणिव निर्माण करणे गरजेचे आहे असे मत जनजातीचे अभ्यासक लक्ष्मण सिंह मरकाम यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये जनजाती नायकांचे योगदान या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमात लक्ष्मण सिंह मरकाम बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सेवा अधिकारी आर.एस. मिश्रा, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.संतोष परचुरे आदी मान्यवर यावेळी उपस्थितीत होते. यावेळी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी १८४ योध्यांच्या कार्याची माहिती देणारे पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले तसेच आदिवासी लोककलांचेही सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान मरकाम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला आदिवासी विद्यार्थ्यांसह मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती.

यावेळी डॉ.कारभारी काळे म्हणाले, आदिवासी समाजातील बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांविरोधातील लढा हा त्यांच्याकडे असणाऱ्या नैसर्गिक हत्यारांच्या साहाय्याने लढला. जंगल, जमीन या तीन मुद्द्यावर त्यांनी लढा दिला. आदिवासी हे खऱ्या अर्थाने शाश्वत विकास करत जगले आहेत. त्यांच्या या जगण्याच्या तत्वज्ञानावर संशोधनाची गरज आहे. तसेच त्यांनी केलेले कार्य सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वूमीवर आंतरविद्याशाखीय अभ्यासात या जननायकांच्या कार्याविषयी होणाऱ्या संशोधनाला खूप वाव आहे.

डॉ. सोनवणे म्हणाले, आदिवासी समाजासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा असा कार्यक्रम घेण्यात येतो आहे. आदिवासी समाजातील नायकांच्या कार्याविषयी पुस्तक प्रसिद्ध करणे, त्यांच्या प्रश्नांवर संशोधन करणे, महाविद्यालयांना मदत करणे या सर्व बाबी विद्यापीठाकडून केल्या जात आहे. या जन नायकांच्या कार्याची माहिती यानिमित्ताने पुढच्या पिढीपर्यंत पोहचत त्यांना यातून नक्कीच प्रेरणा मिळेल.

यावेळी आर.एस.मिश्रा यांनी धेय्य धोरणांविषयी तसेच आयोग करत असलेल्या कामाविषयी माहिती दिली. मिश्रा म्हणाले, आयोगाकडे ऑनलाईन तसेच ऑफलाईन स्वरूपात आपण आपल्या सूचना मांडू शकता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.संजय चाकणे यांनी केले तर आभार डॉ.परचुरे यांनी मानले. थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून अडीचशेहून अधिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading