Friday, August 28, 2026
Latest NewsPUNE

अमित शहा यांच्या हस्ते होणार ‘शिवसृष्टी’च्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा

पुणे  : कै. पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून न-हे, आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’च्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते येत्या रविवार दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता होणार आहे. सदर शिवसृष्टीची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी स्थापन केलेल्या महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान या संस्थेचे विश्वस्त जगदीश कदम यांनी या संदर्भातील माहिती कळविली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा आदी मान्यवर या वेळी उपस्थित असतील, अशी माहितीही कदम यांनी दिली.

१९७४ हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे त्रिशताब्दी वर्ष होते. यानिमित्ताने महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे व प्रदर्शनाचे आयोजन मुंबईच्या शिवाजी पार्क येथे करण्यात आले होते. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानची स्थापना १९६७ च्या एप्रिल महिन्यात सातारच्या राजमाता सुमित्राराजे भोसले, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महारांच्या विचारांचा प्रचार सर्वत्र झाला पाहिजे या उद्देशाने १९९८-९९ साली शिवसृष्टीच्या प्रकल्पाला सुरुवात झाल्याची माहिती कदम यांनी दिली.

सदर प्रकल्प हा आशियातील सर्वात भव्य ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्प असून या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होत आहे. या वेळी पहिल्या टप्प्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या सरकारवाडाचे लोकार्पण शाह करणार आहेत. सरकारवाडा या ठिकाणी कामकाजाचे ठिकाण, संशोधन ग्रंथालय, प्रदर्शन व बहुपयोगी सभागृह उभारण्यात आले आहे. शिवाय गड –किल्ल्यांची सफर, राज्याभिषेकाचा देखावा, महाराजांची आग्रा येथून झालेली सुटका हे प्रसंग थ्री डी तंत्रज्ञान वापरुन साकारण्यात आले आहेत.

चार टप्प्यात तयार होत असलेल्या या प्रकल्पाचा खर्च साधारण ४३८ कोटी रुपये इतका आहे. पहिल्या टप्प्यात ६० कोटी रुपये उत्स्फुर्तपणे देणगीदारांकडून आतापर्यंत या प्रकल्पाला मिळाले आहेत. ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या प्रयोगातून काही निधी उपलब्ध झाला आहे. बाबासाहेब पुरंदरेंनी आपल्या १२ हजारांपेक्षा जास्त व्याख्यानांच्या माध्यमातून जो निधी उभा केला या सगळ्यांच्या मदतीने शिवसृष्टीच्या कार्याला सुरुवात झाली आहे.

नजीकच्या भविष्यात पूर्णत्वास येणा-या शिवसृष्टी प्रकल्पामध्ये २१ एकर परिसरात एक दिवसांची ‘ऐतिहासिक थीम पार्क’ची सफर शिवप्रेमींना करता येणार असून महत्त्वाच्या किल्ल्यांचे व्हर्च्युअल रिअॅलिटीद्वारे होणारे दर्शन, प्रतापगडावरील भवानी मातेचे मंदिर, शिवकालीन अस्त्रांचे शस्त्रागार, दरबार, महाराजांनी सुरु केलेल्या चलनी शिवरायी व राजमुद्रा, अश्वशाळा, व्यापारी पेठ, रंगमंदीर, विजयस्तंभ, राजवाडा, नगारखाना या ठिकाणी पहायला मिळेल. मॅड मॅपिंग सारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने शिवप्रेमी थेट छत्रपती शिवाजी महाराजांना ऐकू शकतील, हे या प्रकल्पाचे प्रमुख वैशिष्ट्य असणार आहे. २१व्या शतकात वावरणाऱ्या प्रत्येक टेक्नोसॅव्ही व्यक्तीला येथे आल्यानंतर तंत्रज्ञानाच्या बाबतीत कोणतीही कमतरता जाणवणार नाही, असा हा प्रकल्प आहे.

शिवसृष्टीचा पहिला टप्पा हा १ डिसेंबर पासून शिवप्रेमींसाठी खुला होणार असून यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असल्याचेही कदम यांनी नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading