Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

प्रतिभावान मुलांच्या पालकांसाठी ‘पॅरेंट-सपोर्ट ग्रुप’ची सुरवात, कन्नड संघ, पुणे तर्फे पुढाकार


पुणे :  “ आपली शिक्षण पद्धती ही सर्वसमावेशक आहे, असे आपण मानतो. या शिक्षण पद्धतीमध्ये सर्व सामान्य विद्यार्थी तसेच कमी क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविले जातात. मात्र विशेष कौशल्य, प्रतिभा असलेले  विद्यार्थी मात्र दुर्लक्षित रहातात. सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीत विशेष कौशल्य असलेल्या मुलांचादेखील विचार होणे गरजेचे आहे,” असे मत कावेरी गिफ्टेड सेंटर’च्या संस्थापकीय संचालक  मालती कलमाडी यांनी व्यक्त केले.

कन्नड संघ, पुणे संचालित प्रतिभावान, विशेष कौशल्य असलेल्या  मुलांसाठी सुरु करण्यात आलेल्या ‘कावेरी गिफ्टेड एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर’तर्फे (केजीईआरसी)  विशेष कौशल्य असलेल्या मुलांच्या पालकांसाठी ‘परेंट-सपोर्ट ग्रुप’ सुरु करण्यात आला आहे. या ग्रुप’ची पहिली बैठक नुकतीच प्रभात रस्ता परिसरातील  डॉ. शामराव कलमाडी हायस्कूलच्या प्रायमरी सेक्शन सभागृहात संपन्न झाली. यावेळी कलमाडी बोलत होत्या. याप्रसंगी केजीईआरसी च्या सहायक संचालिका डॉ. देवसेना देसाई आणि  नर्चरिंग डोमेन प्रमुख डॉ. समीना मनासावाला उपस्थित होत्या. बैठकीत पालकांनी विशेष कौशल्य असलेल्या मुलांचे संगोपन करताना त्यांना आलेले अनुभव, अडचणी  मांडल्या.

यावेळी कलमाडी म्हणाल्या, “  एखाद्या विद्यार्थ्याकडे विशेष गुणवत्ता अथवा कौशल्य असते. मात्र अनेकदा ते समजूनही, शिक्षक अथवा पालक या नात्याने त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यास आपण कमी पडतो. अशा विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याच्या हेतूने आम्ही हा उपक्रम राबवीत असून, विशेषतः शिक्षकांना ह्यासाठी प्रशिक्षित करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी कावेरी गृप पुणे,च्या सर्व शाळांमधील शिक्षकांना आम्ही या संदर्भातील प्रशिक्षण देत आहोत.’’

विशेष कौशल्य असलेल्या मुलांसाठी शास्त्रोक्त शिक्षण पद्धती विकसित करण्याच्या हेतूने यासंदर्भात अधिक संशोधन होणे गरजेचे असून, यासाठी आम्ही एसएससी, आयसीएससी, सीबीएससी बोर्ड आणि विद्यापीठे यांच्यासोबत विविध संशोधन प्रकल्प राबविण्यासाठी उत्सुक आहोत, असेही कलमाडी यांनी सांगितले.

डॉ. देसाई म्हणाल्या, ” आपल्या शिक्षण पद्धतीत बहुतांश पणे कौशल्यापेक्षा परिक्षेत मिळणाऱ्या गुणांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाते. जेव्हा एखादा विद्यार्थी कुठल्यातरी स्पर्धेत चांगली कामगिरी करतो, तेव्हाच आपण त्याचे कौतुक करतो. पण ते कौशल्य जोपासण्यासाठी त्याने केलेला संघर्ष आपण लक्षात घेत नाही किंवा त्याला प्रोत्साहन देत नाही.  विशेष कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांच्या गरजा समजून घेऊन त्यांना  सामाजिक आणि भावनिक आधार देणे ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी पालकांचा सपोर्ट ग्रुप गरजेचा आहे कारण, मुलांच्या जडणघडणीत सुरवातीपासून शेवटपर्यंत पालकांची भूमिका महत्वाची असते.”

बैठकीत सहभागी पालक निवेदिता कुलकर्णी म्हणाल्या, “ अनेकदा पालकांना आपला मुलगा किंवा मुलगी ‘गिफ्टेड’ आहे, म्हणजे नेमके काय हे कळत नाही. या मुलांचे संगोपन करतानाही बऱ्याच अडचणी येतात. ही मुले अतिशय संवेदनशील असल्याने अगदी बारीक गोष्टी देखील त्यांच्या मनावर गंभीर परिणाम करतात. त्यामुळे त्यांचे मानसशास्त्र समजून घेणे खूप महत्वाचे असते. पण अनेकदा या विषयात काय करायचे हे पालकांना माहित नसते. अशावेळी आपल्या सारख्या काही पालकांच्या अनुभवातून आपल्याला काहीतरी शिकता येईल, त्यांची मदत घेता येईल असे मला वाटते. त्यामुळेच हा पॅरेंट सपोर्ट गृप महत्वाचा ठरतो.’’

ह्या सपोर्ट गृपमध्ये  जास्तीत जास्त पालकांनी सहभागी होऊन प्रतिभावान मुलांच्या जडणघडणीत आपलं योगदान द्यावं असे आवाहन मालती कलमाडी यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading