Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

‘तालचक्र’ महोत्सवात पुणेकरांना अनुभवता येणार ताल वाद्यांशी संबंधित वैविध्यपूर्ण सांगीतिक कार्यक्रम   

पुणे : प्रसिद्ध तबलावादक पद्मश्री विजय घाटे व पुनीत बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘तालचक्र’ हा ३ दिवसीय संगीत महोत्सव दिनांक १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत पुणे शहरात संपन्न होणार आहे. तालवाद्यांना केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात येणाऱ्या देशातील या पहिल्या संगीत महोत्सवाचे हे सलग १० वे वर्ष असून यंदा महोत्सवाला बढेकर ग्रुप, पू.ना गाडगीळ अँड सन्स व लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटी यांचे सहकार्य लाभले आहे अशी माहिती महोत्सवाच्या संकल्पनेचे जनक पदमश्री विजय घाटे यांनी दिली. यावेळी महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी असणारे राजस उपाध्ये उपस्थित होते.
महोत्सवातील पहिल्या दिवशी असणारे कार्यक्रम हे टिळक रस्ता येथील न्यू इंग्लिश स्कूलचे गणेश सभागृह तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी असणारे कार्यक्रम हे कोथरूड येथील महालक्ष्मी लॉन्स येथे संपन्न होतील. कार्यक्रमाची वेळ तीनही दिवशी संध्याकाळी ६ ते रात्री १० अशी असेल.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच दिनांक १८ नोव्हेंबर रोजी गणेश सभागृह, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता येथे तबलावादक पांडुरंग पवार आणि पखवाज वादक सुखद मुंडे हे तबला – पखवाज जुगलबंदी सादर करतील. पवार हे प्रसिद्ध तबलावादक रामदास भोईर यांचे शिष्य असून, दिल्ली, फारुखाबाद, लखनऊ आणि पंजाब अशा विविध घराणा पद्धतीत तबलावादन हे त्यांच्या वादनाचे वैशिष्ट्य आहे. तर सुखद मुंडे हे प्रसिद्ध पखवाज वादक पं.माणिक मुंडे यांचे पुत्र आणि शिष्य आहेत. भक्त गणेश अण्णा चौधरी आणि पं. गोविंदराव देशमुख यांच्याकडून त्यांनी पखवाज वादनाचे धडे घेतले आहेत. दुसऱ्या सत्रात हार्मोनियम वादक तन्मय देवचके हे आपल्या सहकालाकारांसोबत देशी- विदेशी वाद्यांच्या साथीने हार्मोनियमवादनाचा अनोखा असा ‘तन्मय इन हार्मनी’ हा कार्यक्रम सादर करतील.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ नोव्हेंबर रोजी कोथरूड येथील महालक्ष्मी लॉन्स येथे  संगीत मार्तंड पं. जसराज यांच्या अभिजात रचनांवर आधारित ‘आवत मोहन’ हा डान्स बॅले सादर होणार आहे. प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना शमा भाटे यांनी या कार्यक्रमाची संकल्पना मांडली आहे. त्यानंतर प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरासिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा ‘फ्युझन २०२२ राकेश अँड फ्रेंड्स’ हा विशेष कार्यक्रम सादर होईल. या विशेष कार्यक्रमात राकेश चौरासिया यांच्या साथीला असतील प्रसिद्ध ड्रमर जीनो बँक्स, तबला वादक ओजस अढीया, बास गिटार वादक शेल्डन डिसिल्वा, कीबोर्ड वादक आणि गायक संगीत हल्दिपूर, गिटार वादक संजय दास आणि श्रीधर पार्थसारथी. अत्यंत वैशिट्यपूर्ण असा हा कार्यक्रम पुण्यात बऱ्याच वर्षांनी सादर होत आहे.

महोत्सवात तिसऱ्या दिवशी (दिनांक २० नोव्हेंबर) पहिल्या सत्रात कोथरूड येथील महालक्ष्मी लॉन्स येथे लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे सुपुत्र व प्रसिद्ध ढोलकी वादक विजय चव्हाण यांचा महाराष्ट्रातील विविध पारंपारिक ताल वाद्यांवर आधारित ‘फोक ड्रम्स ऑफ महाराष्ट्र’ हा विशेष कार्यक्रम सादर होईल. दहाव्या तालचक्र महोत्सवाचा समारोप जागतिक किर्तीचे कलाकार व विविध तालवाद्य वाजवण्यात निपुण असणारे सिवामणी, सुप्रसिद्ध तबला वादक पद्मश्री विजय घाटे आणि कथक नृत्यांगना शीतल कोलवलकर यांचा एकत्रित कलाविष्काराने होईल.

दहाव्या वर्षाचे औचित्य साधत यावर्षी पुणे वगळता आणखी १० ठिकाणी महोत्सव आयोजित करण्याचा आमचा मानस आहे अशी माहितीही विजय घाटे यांनी दिली. महोत्सवात १८ नोव्हेंबर रोजी सादर होणाऱ्या कार्यक्रमांसाठी प्रवेश विनामूल्य असेल. तर १९ आणि २० नोव्हेंबर रोजी सादर होणाऱ्या कार्यक्रमांसाठी प्रवेश सशुल्क असेल. या दोन्ही दिवशी असलेल्या सर्व कार्यक्रमांच्या सीझन तिकीटाची किंमत फक्त रुपये ३०० इतकी आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading