राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘सुमी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित…
डोळ्यांत अनेक स्वप्नं असणाऱ्या हसऱ्या ‘सुमी’चे पोस्टर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर झळकले. कोण आहे ही ‘सुमी’ याची उत्सुकता लागलेली असतानाच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. बालदिनाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘सुमी’ प्रत्येकाने पाहावा असाच आहे. ‘सुमी’ जिची भरपूर शिक्षण घेऊन ऑफिसर बनण्याची इच्छा आहे. तिच्या स्वप्नापर्यंत पोहोचण्याचा प्रवास यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिक्षणाची प्रचंड ओढ असणाऱ्या ‘सुमी’ची भूमिका आकांक्षा पिंगळे हिने साकारली असून याव्यतिरिक्त या चित्रपटात दिवेश इंदुलकर, स्मिता तांबे, नितीन भजन यांच्याही मुख्य भूमिका आहेत. अमोल वसंत गोळे दिग्दर्शित या चित्रपटाला रोहन -रोहन यांनी संगीत दिले आहे.
ही कहाणी फक्त ‘सुमी’ची नसून तिच्या आईवडिलांचीही आहे. “पोरीचं लगीन तर सगळेच करतात, मी माझ्या पोरीला शिकवून पाहते” असं म्हणणारी ‘सुमी’ ची आई ही तेवढीच महत्वाकांक्षी व जिद्दी असल्याचे दिसून येतेय. आता ‘सुमी’चे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होते की, तिला शिक्षणाला पूर्णविराम द्यावा लागतो, हे ‘सुमी’ पाहिल्यावरच कळेल.’सुमी’ लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला येणार आहे.
प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२ मध्ये ‘सुमी’ला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट आणि चित्रपटातील दोन्ही बालकलाकारांना ‘सर्वोत्कृष्ट बालकलाकार’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ‘सुमी’ ही एका महत्वकांक्षी मुलीची कहाणी असून हा एक कौटुंबिक चित्रपट आहे.”
दिग्दर्शक अमोल गोळे म्हणतात, ” ‘सुमी’ हा चित्रपट आमच्या संपूर्ण टीमसाठी आव्हानात्मक होता. मुळात या चित्रपटातील दोन्ही बालकलाकार हे नवखे आहेत. सुमीच्या ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद उत्तम असून चित्रपटालाही असाच प्रतिसाद मिळेल, अशी आशा करतो.”
अक्षय बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत, हर्षल कामत एंटरटेनमेंट व गोल्डन माउस प्रोडक्शन्स, ए. ए. क्रिएशन्स, फ्लायिंग गॉड फिल्म्स निर्मित ‘सुमी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल वसंत गोळे यांनी केले आहे. हर्षल कामत, स्वाती एस. शर्मा, मिहिर कुमार शर्मा हे निर्माते असून अंजली आनंद पांचाळ, जयादित्य गिरी, जयंत येवले व सोनाली जयंत हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची मूळ कथा – पटकथा संजीव झा यांची आहे. तर या चित्रपटाला प्रसाद नामजोशी यांचे संवाद आणि गीत लाभले आहे.
