पीवायसी- विजय पुसाळकर पीवायसी प्रीमियर क्रिकेट लीग 2022 स्पर्धेस 14 नोव्हेंबरपासून प्रारंभ
पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने नवव्या पीवायसी- विजय पुसाळकर प्रीमियर लीग क्रिकेट 2022 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि.14 ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत पीवायसी मैदानावर होणार आहे.
पत्रकारपरिषदेत अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष श्री कुमार ताम्हाणे, क्लबचे सचिव श्री सारंग लागू, खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर आणि पुसाळकर सुरक्षा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक रोहन पुसाळकर यांनी सांगितले की, स्पर्धेचे हे नववे वर्ष आहे. या स्पर्धेत 15 संघ सहभागी झाले आहेत. एकूण 200 खेळाडूंच्या सहभागातून घेण्यात आलेल्या लिलावात रोहन छाजेड(4800पॉईंट्स, बॉबकॅट्स), कर्ना मेहता(4800पॉईंट्स, पँथर्स), श्रीनिवास चाफळकर(4800पॉईंट्स, टस्कर्स), प्रसाद जाधव(4500पॉईंट्स, स्कायलार्क्स), अभिजीत शिरोडकर(4500, डाऊनटाऊन), अक्षय ओक(4500पॉईंट्स, लेपर्डस), हर्षल गंद्रे(टस्कर्स, 4300पॉईंट्स), रवी कासट(4300पॉईंट्स, जॅगवॉर्स), आत्मन बागमार(4200पॉईंट्स, स्कायलार्क्स)यांचाही सहभाग आहे. होडेक वायब्रेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक हर्निश राजा, बेलवलकर हाऊसिंगचे समीर बेलवलकर, श्रीनिवास चाफळकर, आमिर आजगावकर, इंद्रनील चितळे, अभिषेक ताम्हाणे, नंदन डोंगरे, निरंजन गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध क्रिडाप्रकारांना वेळोवेळी प्रोत्साहन देण्यासाठी पीवायसी क्लब नेहमीच आघाडीवर असतो. या स्पर्धेला श्री विजय पुसाळकर यांचे सलग पाचव्या वर्षी प्रायोजकत्व लाभले आहे. होडेक यांचे पण सहप्रायोजक म्हणून सलग पाच वर्ष सहकार्य लाभले आहे. बेलवलकर हाऊसिंग लिमिटेड, चाफळकर करंदीकर डेव्हलपर्स, सुप्रीम कॉन्स्ट्रो प्रॉडक्ट्स यांचे सहप्रायोजकत्व मिळाले आहे तर हमद एअर चार्टर्स यांचा पाठिंबा आणि चितळे बंधु मिठाईवाले हे फूड पार्टनर म्हणून लाभले आहेत. त्रैडेन्ट सर्विसेस प्रा. ली हे पॉवर पार्टनर म्हणून लाभले आहेत.
ते पुढे म्हणाले की, स्पर्धेत प्रत्येक संघात एका सामन्यासाठी प्रत्येकी 9 खेळाडूंचा समावेश असणार आहे. स्पर्धेचे सामने हे 6 षटकांचे होणार आहेत. स्पर्धेसाठी क्रिकेट टेनिस बॉलचे सर्व नियम लागू असून सर्व सामने सायंकाळी 4.00 ते रात्री 10.00 या वेळेत होणार असून काही सामने विद्युताप्रकाश झोतात होणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना दि. 20 नोव्हेंबर 2022 या दिवशी होणार आहे.
या स्पर्धेत आर्यन स्कायलार्क्स, बेलवलकर बॉबकॅट्स, गोल्डफिल्ड डॉल्फिन्स, कोतवाल बदामीकर युनिकॉर्नस, लर्नपंक्त डायनोज,एनएच वुल्व्हस, नॉक99 पँथर्स, ओव्हनफ्रेश टस्कर्स, राहुल डाउनटाऊन, रावेतकर बुल्स, रॉयल स्टॅलियन्स, सैनुमेरो चिताज, स्नो लेपर्डस, स्वोजस टायगर्स, ट्रूस्पेस जॅगवॉर्स हे 15 संघ भाग घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धेबद्दल अधिक माहिती देताना क्रिकेट विभागाचे सचिव श्री. विनायक द्रविड म्हणाले की स्पर्धेतील 15 संघांची 3 गटात विभागणी करण्यात आली आहे. तसेच, या तीनही गटांतील अव्वल व दुय्यम संघ उपांत्यपुर्व फेरीसाठी पात्र ठरणार असून आणखी दोन संघ गुणसरासरी आणि नेटरनरेटच्या आधारावर पात्र ठरणार आहेत. प्रत्यक्ष मैदानावर खेळण्याचा व क्रिकेटवरचे प्रेम व्यक्त करण्याचा अनुभव या माध्यमांतून सभासदांना मिळणार आहे. या उपक‘माचे स्वरूप जरी स्पर्धात्मक असले, तरी पण प्रत्यक्षात सभासदांना या खेळाची मजा लुटता येणार आहे. विजेत्या संघाला ज्ञानेश्वर आगाशे स्मृती करंडक देण्यात येणार असून याशिवाय वैयक्तिक पारितोषिकेहि दिली जाणार आहे.
स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये विनायक द्रविड, अभिषेक ताम्हाणे, इंद्रजित कामतेकर, शिरीष आपटे, सिद्धार्थ दाते, नंदन डोंगरे, रणजित पांडे व कपिल खरे यांचा समावेश आहे. निरंजन गोडबोले हे स्पर्धेचे डायरेक्टर म्हणून काम पाहतील.
