केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागतायेत – उद्धव ठाकरे
मुंबई : संजय राऊत यांच्या धाडसाचं कौतुक आहे. संजय राऊत हे शिवसेना नेते तर आहेतच पण त्याच बरोबरीने माझे मित्र आहेत. मित्र संकटकाळी फक्त सोबत राहत नाही तर तो लढतो. त्याप्रमाणे संजय राऊत लढत आहेत. न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला. पण केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत, हे देश पाहतोय. कालच्या न्यायालयाच्या निकालाने हे अधोरेखीत झाले आहे, असं वक्तव्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
शिवसेना खासदार संजय राऊत हे काल (दी. 9) जामिनावर तुरुंगातून बाहेर आले आहेत. त्यानंतर त्यांनी आज सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांची भेट घेत अन् संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
ठाकरे म्हणाले, आजपर्यंत केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून अनेक पक्ष फोडले गेले. अनेक पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. कालचा दणका न्यायालयाने दिल्यानंतरही कदाचित संजय राऊत यांना इतर खोट्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पण कर नाही तर डर कशाला, जे घाबरून पक्ष सोडून पळून गेले, त्यांच्यासाठी हा धडा आहे.
संजय राऊत म्हणाले, शिवसेना एकच आहे, गट वगैरे काही नाही.शिवसेना एक कुटुंब आहे. उद्धव ठाकरे यांनी माझ्या कुटुंबाची काळजी घेतील. या विश्वासामुळे मी तुरुंगाच निश्चिंत होतो. शिवसेनेसाठी मला 10 वेळा जरी तुरुंगात जावं लागलं तरी मी जाईन. पक्षासाठी काही करण्याची संधी मिळाली तर मागे पुढे पाहणार नाही. पक्षाशी बेईमानी करणार नाही. स्वत:ची सुटका करायची म्हणून पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसणार नाही.’
