बालदिनाचे औचित्य साधत नवोदित कलाकारांसाठी ‘मुकुला’ कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने व एक सक्षम व्यासपीठ तयार करण्याच्या उद्देशाने पुण्यातील कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट दरवर्षी ‘मुकुला’ या खास कार्यक्रमाचे आयोजन करीत असते. याही वर्षी बालदिनाचे औचित्य साधत सोमवार दि. १४ नोव्हेंबर रोजी मयूर कॉलनी मधील एमईएस बालशिक्षण मंदिर येथे सायं. ६ वाजता सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून प्रथम येणा-यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येणार आहे.
वय वर्षे ९ ते १९ या वयोगटातील कलाकारांचे सादरीकरण हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असून यामध्ये संगीतकार उदय रामदास यांचे शिष्य समूह सादरीकरण करणार आहेत. याबरोबरच भरतनाट्यम गुरु आशा सुनीलकुमार यांची शिष्या आश्लेषा शिंदे या भरतनाट्यम, कथक गुरु शमा भाटे यांची शिष्या संतेरी अभ्यंकर या कथक सादरीकरण, तबलावादक निलेश रणदिवे यांचे शिष्य गंधार निसाळ हे तबला तर पं. शौनक अभिषेकी यांचे पुत्र व शिष्य अभेद अभिषेकी हे गायन प्रस्तुती करतील.
सुप्रसिद्ध गायिका अंजली मराठे आणि भरतनाट्यम गुरु डॉ. सुचेता भिडे चापेकर या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असतील.
याविषयी अधिक माहिती देताना कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टच्या अरुंधती पटवर्धन म्हणाल्या, “९ ते १९ वयोगटातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने आम्ही दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करीत असतो. सदर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेतील स्वयंसेवकच करीत असतात हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे.”
