‘चालविसी हाती धरूनिया…’ कार्यक्रमातून उलगडणार डॉ. स्वाती व धनंजय दैठणकर यांच्या सांगीतिक सहजीवनाचा प्रवास
पुणे : दोन कलाकार सहजीवनासोबतच जेव्हा कलेच्या माध्यमातून एकमेकांना पूरक असे काम करून कलेची साधना करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना आलेले अतर्क्य अनुभव, गमतीजमती आणि त्यांचा प्रवास ऐकण्यासारखा असतो. याच अनुभवांची एक मैफल अनुभविण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार आहे. निमित्त आहे सहजीवनासोबतच कलेच्या क्षेत्रातील एकत्र मुशाफिरी अनुभविणा-या डॉ. स्वाती व धनंजय दैठणकर या दाम्पत्याच्या सांगीतिक सहजीवनाचा प्रवास मांडणा-या ‘चालविसी हाती धरूनिया…’ या कार्यक्रमाचे.
येत्या रविवार दि. १३ नोव्हेंबर रोजी टिळक स्मारक मंदिर येथे सकाळी ९ वाजता सदर कार्यक्रम होणार असून, तो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. यामध्ये नीरजा आपटे या प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना व गुरू डॉ. स्वाती दैठणकर आणि पं. शिवकुमार शर्मा यांचे ज्येष्ठ शिष्य संतूरवादक डॉ. धनंजय दैठणकर यांची मुलाखत घेणार आहे. मुलाखती सोबतच या दोघांनी आजवर काम केलेल्या कार्यक्रमाची झलक यादरम्यान रसिकांना पहायला मिळेल.
लग्नानंतर आम्ही दोघेही एकमेकांच्या कलांना वाव देत पुढे जात राहिलो. नृत्य आणि वादन या क्षेत्रात असताना २००० साली अपघाताने आम्ही एकत्र येत ‘नुपुरनाद’ या प्रकल्पावर काम केले. नृत्यदिग्दर्शन व संगीत दिग्दर्शन या क्षेत्रात आपण एकत्र काम करू शकतो, हा विश्वास या दरम्यान आला. यानंतर म्हणजे गेली २२ वर्षे तब्बल १५ प्रकल्प आणि त्यांचे असंख्य प्रयोग केले. अमेरिका, फ्रान्स, स्वित्झर्लंड, कॅनडा, इटली व सिंगापूर या देशांतही त्याचे प्रयोग झाले. हाच प्रवास या कार्यक्रमामधून मांडण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती यावेळी डॉ. स्वाती दैठणकर यांनी दिली.
आम्ही एकत्रितपणे केलेल्या सर्व नृत्यप्रकल्पांचे संगीत हे डॉ. धनंजय यांनी दिले असून, आम्ही आयुष्यभर कलेचा संसार केला अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
१३ नोव्हेंबर रोजी ‘चालविसी हाती धरूनिया…’ या कार्यक्रमाचा शुभारंभाचा कार्यक्रम असून यानंतर पुणे, मुंबई, नाशिक आणि एप्रिल महिन्यात अमेरिकेत याचे प्रयोग होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
या कार्यक्रमात डॉ. स्वाती दैठणकर यांच्या ज्येष्ठ शिष्या त्यांच्या सोबत सादरीकरण करणार असून याची संकल्पना, संरचना व संयोजन स्वत: डॉ. स्वाती यांनी केले आहे, हे विशेष. कार्यक्रमाची प्रकाशयोजना तेजस देवधर यांची असणार आहे.
