विवो प्रो कबड्डी स्पर्धेत पाटणा पायरेट्सचा पलटवार यु मुंबावर आश्चर्यजनक विजय
पुणे : मशाल स्पोर्टस यांच्या वतीने आयोजित नवव्या विवो प्रो कबड्डी स्पर्धेत साखळी गटात पूर्वार्धात पाच गुणांनी पिछाडीवर असलेल्या पाटणा पायरेट्स संघाने यु मुंबा संघावर ३४-३१ अशी मात केली आणि विवो प्रो कबड्डी स्पर्धेत सनसनाटी विजय नोंदविला.
शिवछत्रपती क्रीडा नगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेतील पहिल्या नऊ सामन्यांमध्ये यु मुंबा संघाने सहा सामने जिंकले होते तर माजी विजेत्या पाटणा संघाने नऊ सामन्यांपैकी तीनच सामन्यांमध्ये विजय मिळविला होता. त्यामुळे मुंबा संघाचे पारडे जड मानले जात होते. सामन्याच्या १८ व्या मिनिटाला मुंबा संघाने पहिला लोण चढवित पाच गुणांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. मध्यंतराला त्यांच्याकडे १८-१३ अशी आघाडी होती.
उत्तरार्धात मात्र पाटणा संघाच्या खेळाडूंनी चिवट लढत देत पहिला लोण चढवित २०-२० अशी बरोबरी साधली. त्यामुळे सामन्यातील रंगत वाढली. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये आघाडी घेण्यासाठी सतत चढाओढ दिसून आली. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना पाटणा संघाकडे एक गुणाची आघाडी होती. तीन मिनिटे बाकी असताना त्यांनी आणखी एक लोण चढवीत आपली आघाडी वाढविली. शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवीत त्यांनी विजयश्री खेचून आणली.
पाटणा संघाकडून सुनील कुमार व मोहम्मद रेझा यांनी भक्कम पकडी केल्या तर सचिन कुमार याने प्रभावी चढाया करीत चांगले गुण मिळविले. मुंबा संघाकडून जय भगवान व आशिष कुमार यांनी खोलवर चढाया केल्या तर सुरेंदर सिंगने उत्कृष्ट पकडी केल्या.
