शुक्रवार पेठेत साकारली पेमगिरी दुर्गाची मातीची प्रतिकृती
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्मितीची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली आणि हिंदवी स्वराज्य उभे केले. अशा या स्वराज्याचे डोहाळे ज्या गडावर लागले, त्या हिंदवी स्वराज्य संकल्प भूमी असलेला, वडिल शहाजीराजे यांच्या कर्तृत्वाची निशाणी सांगणारा, शिवरायांचे बालपण पाहणारा परंतु काळाच्या प्रवाहात दुर्लक्षित असलेला किल्ले पेमगिरी. आकाराने इतर दुर्गांच्या तुलनेत छोटा असला, तरी इतिहासाने मोठया असलेल्या या दुर्गाची मातीची प्रतिकृती शुक्रवार पेठेत साकारण्यात आली आहे.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ आणि शिवसूर्य प्रतिष्ठान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी किल्ला हा उपक्रम राबविण्यात येतो. उपक्रमाचे हे सलग १५ वे वर्ष असून, यंदा हिंदवी स्वराज्याची संकल्प भूमी असलेला किल्ले पेमगिरी साकारण्यात आला आहे. सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, अध्यक्ष सागर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कलाकार सुरेश तरलगट्टी, संदीप दुडम, रविंद्र काची व हर्ष गांधी यांनी हा किल्ला साकारला आहे.
नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पेमगिरी गावाजवळ हा किल्ला आहे. भीमगड, शहागड, पेमाईगड अशा विविध नावांनी हा किल्ला पंचक्रोशित प्रसिद्ध आहे. त्यामुळे मंडळाने या किल्ल्याची १४ बाय १४ फूट आकारातील प्रतिकृती साकारली आहे. किल्ल्यावर होत असलेल्या संवर्धन कार्याची माहिती सर्व शिवदुर्गप्रेमी, इतिहासप्रेमी आणि जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न यामाध्यमातून होत आहे. हा किल्ला शनिवार, दिनांक ५ नोव्हेंबर पर्यंत दररोज सायंकाळी ७ ते रात्री १२ यावेळेत पाहण्यासाठी विनामूल्य खुला आहे.
