ब्रिलीयंट्स स्पोर्ट्स अॅकॅडमी संघाची विजयी सलामी !!
‘पी. एन. सुरतवाला करंडक’ १५ वर्षाखालील मुलींची क्रिकेट स्पर्धा
पुणे; क्रिक् चॅलेंजर्स आणि ब्रिलीयन्ट् स्पोर्ट्स अॅकॅडमी यांच्या तर्फे आयोजित ‘पी. एन. सुरतवाला करंडक’ (कै. श्रीमती पुष्पाबेन नटवरलाल सुरतवाला) १५ वर्षाखालील मुलींच्या ५०-५० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत ज्ञानदा निकम हिच्या १२६ धावांच्या खेळीच्या जोरावर ब्रिलीयंट्स स्पोर्ट्स अॅकॅडमी संघाने सांगली गर्ल्स संघाचा १४७ धावांनी सहज पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली.
येवलेवाडी येथील ब्रिलीयन्ट् स्पोर्ट्स अॅकॅडमी मैदानावर झालेल्या सामन्यात ब्रिलीयंट्स स्पोर्ट्स अॅकॅडमी संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ४५ षटकात ७ गडी गमावून २४३ धावांचा डोंगर रचला. ज्ञानदा निकम हिने १०४ चेंडूत २१ चौकारांच्या मदतीने १२६ धावांची खेळी साकारली. ज्ञानदाने एकहाती फलंदाजी करताना संघाच्या डावाला आकार दिला. ज्ञानदा आणि मृण्मयी क्षीरसागर (१३ धावा) या दोघींनी तिसर्या गड्यासाठी ९६ चेंडूत ९४ धावांची भागिदारी रचली. यासह सृष्टी सुर्यवंशी (२५ धावा) आणि तनिष्का माळी (नाबाद २० धावा) यांनीही धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले.
या आव्हानाचा पाठलाग करताना सांगली गर्ल्स संघाचा डाव गडगडला. अचूक गोलंदाजीसमोर ठराविक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत गेले आणि सांगली संघ २८.२ षटकात व ९६ धावांवर गारद झाला. सांगली संघाकडून सरस्वती कोकरे हिने नाबाद ११ धावा केल्या. ज्ञानदा निकम हिने फलंदाजीनंतर गोलंदाजीमध्ये कमाल करताना १० धावात ३ गडी बाद केले. सौम्या सावंत हिने सुरवातीलाच धक्के देताना ११ धावात २ गडी बाद केले.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
ब्रिलीयंट्स स्पोर्ट्स अॅकॅडमीः ४५ षटकात ७ गडी बाद २४३ धावा (ज्ञानदा निकम १२६ (१०४, २१ चौकार), सृष्टी सुर्यवंशी २५, तनिष्का माळी नाबाद २०, सरस्वती कोकरे ३-२४);(भागिदारीः तिसर्या गड्यासाठी ज्ञानदा आणि मृण्मयी क्षीरसागर (१३ धावा) ९४ धावा (९६) वि.वि. सांगली गर्ल्सः २८.२ षटकात १० गडी बाद ९६ धावा (सरस्वती कोकरे नाबाद ११, ज्ञानदा निकम ३-१०, सौम्या सावंत २-११); सर्वोत्कृष्ट खेळाडूः ज्ञानदा निकम.
