पुण्यातील कुशल क्रेडाई’चे दोन प्रशिक्षणार्थी करणार जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधत्व
पुणे : जागतिक व्यासपीठावर भारतीय बांधकाम कौशल्याची छाप उमटविण्याच्या हेतूने पुण्यातील कुशल क्रेडाई’चे दोन प्रशिक्षणार्थी जागतिक कौशल्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधत्व करणार आहे. मोहनीश कमल हा ऑस्ट्रिया येथील ‘ब्रिक लेयिंग’ स्पर्धेत, तर संजीवकुमार सबावत हा इटली येथील ‘वॉल आणि फ्लोअर टायलिंग’ स्पर्धेत घेणार सहभाग घेणार आहे. हे दोन्ही स्पर्धक राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते आहेत. कुशल क्रेडाई आणि रोटरी क्लब ऑफ रीव्हारसाईड’तर्फे नुकतेच एआयएसएसएमएस शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात या दोन्ही प्रशिक्षणार्थीना स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी कुशल – क्रेडाई’चे अध्यक्ष जे पी श्रॉफ, कुशल क्रेडाई आणि कामगार कल्याण समितीचे सदस्य मिलिंद तलाठी, समीर बेलवलकर, पराग पाटील, डॉ. डी.के. अभ्यंकर आणि ऊर्मिला जुल्का उपस्थित होते.
वर्ल्ड स्किल कॉम्पिटीशन अर्थात जागतिक कौशल्य स्पर्धा ही ओलीन्म्पिक स्तरावरील जागतिक स्पर्धा आहे. दर दोन वर्षानी आयोजित होणाऱ्या या स्पर्धेत जगभरातील प्रतिस्पर्धी हे विविध कौशल्यांचे सादरीकरण करतात. यामध्ये यंदा भारताचे प्रतिनिधी हे आपल्या बांधकाम कौशल्यांचे सादरीकरण करणार आहेत. इटली येथे १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ‘वॉल आणि फ्लोअर टायलिंग’ स्पर्धेत संजीव कुमार सोबत जे पी श्रॉफ आणि मिलिंद तलाठी हे रवाना होणार आहे. तर २० नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रिया येथे होणाऱ्या ‘ब्रिक लेयिंग’ स्पर्धेत मोहनीश कमल आणि प्रशिक्षक पल्लवी कोठारी सहभागी होणार आहे.
स्पर्धेतील आपल्या सहभागाबाबत संजीव कुमार म्हणाले, “ मी मूळचा तेलंगाना येथील रहिवासी आहे. पुण्यात कुशल क्रेडाई येथील बांधकाम कौशल्य प्रशिक्षणाबाबत माहिती मिळाल्यानंतर मी येथे ‘वॉल आणि फ्लोअर टायलिंग’ चे प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली. मी गेली सहा वर्षे या स्पर्धेसाठी तयारी करत आहे. मी तब्बल तीन वेळा राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत सहभाग घेतला होता, आणि अपयशी झालो होतो. मात्र त्यामुळे मी खचून न जाता, पुन्हा प्रयत्न करत राहिलो. त्यामुळेच आज न केवळ राष्ट्रीय परंतु जागतिक कौशल्य स्पर्धेत मी साहभागी होणार आहे. जागतिक स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत असल्याने अतिशय आनंद होत आहे.’’
प्रशिक्षणार्थी मोहनीश कमल म्हणाले, “ मी मूळचा ओरिसा येथील रहिवासी असून, स्थापत्य अभियांत्रिकी विषयाचे शिक्षण पूर्ण केले आहे. माझ्या विद्यापीठातील एक विद्यार्थी या जागतिक स्पर्धेत सहभागी झाला होता. त्यामुळेच मला या स्पर्धेबाबत माहिती मिळाली आणि त्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा निर्माण झाली. क्रेडाई -कुशल येथे ‘ब्रिक लेयिंग’ या बांधकाम कौशल्याचे प्रशिक्षण मी घेतले. या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाल्याने अतिशय आनंद होत असून, देशासाठी मी निश्चित पदक मिळवेल, असा मला विश्वास आहे.’’
या स्पर्धेतील सहभागाबाबत बोलताना कुशल क्रेडाई’चे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ म्हणाले, “ कुशल-क्रेडाई येथे ‘बांधकाम कौशल्य क्षेत्रात देशाचे सक्षमीकरण’ या ब्रीदवाक्याला अनुसरून, विविध बांधकाम कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. यावर्षी आम्ही तब्बल ३० कौशल्य स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये आम्हाला २ रौप्य पदक, ३ कांस्य पदक आणि ११ उत्कृष्टतेची पदके मिळविली. यावर्षी देखील संस्थेचे दोन प्रशिक्षणार्थी जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होत असून, गेली दीड वर्ष प्रशिक्षनार्थीना कठोर शारीरिक आणि कौशल्य प्रशिक्षण त्यांना दिले जात आहे. यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) आणि भारतीय कौशल्य विकास परिषद ( सीएसडीसीआय) या संस्थांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले.’’
