ट्रान्सजेंडर्स सोबत साजरी केली माय होम इंडिया ने समरसता दिवाळी
पुणे:पुण्यातील माय होम इंडियाच्या पुणे शाखेने संस्थापक श्री सुनील देवधर (राष्ट्रीय सचिव, भाजप) यांच्या उपस्थितीत ट्रान्सजेंडर समाजबांधवां सोबत दिवाळी साजरी केली. याप्रसंगी बोलताना श्री सुनील देवधर म्हणाले की समाजात ट्रान्सजेंडर समाजबांधवां संबंधात तुच्छता, भीती, अनादर अशा संमिश्र भावना आढळतात. मात्र ही माणसेच आहेत. त्यांनाही आपल्या सारख्याच भावना असतात. त्यांना समाजात अन्य घटकां सारखाच सन्मान मिळायला हवा. ट्रान्सजेंडर समाजा सोबत सर्व समाजाने समरस व्हावे, त्यांना बरोबरीच्या नात्याने वागवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी ट्रान्सजेंडर समाजाच्या पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या पन्ना दीदी यांनी श्री सुनील देवधर यांचे स्वागत केले. या निमित्ताने एक चांगले पाऊल उचलल्या बद्दल आनंद व्यक्त केला. याप्रसंगी 300 पेक्षा अधिक ट्रान्सजेंडर समाजबांधवांना दिवाळी फराळ व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी माय होम इंडिया चे श्री श्रवण झा, सीमा लिमये, ईशा लिमये, अभय थिटे, रा स्व संघाचे महानगर सेवाप्रमुख महेश राव मानेकर उपस्थित होते.
याच दिवशी अन्य दोन कार्यक्रमांच्या माध्यमातून माय होम इंडिया संस्थेने समरसता दिवाळी चे आयोजन केले होते. या निमित्ताने श्री देवधर यांनी बोपोडी गावठाण येथील वस्तीतील आदर्श मातांचा सत्कार व वस्तीतील एका कुटुंबासोबत फराळ व भाऊबीज साजरी केली.
तसेच बावधन येथील कार्यक्रमात ईशान्य भारतातून आलेले विद्यार्थी व पुणे स्थित ईशान्य भारतीय कुटुंबांना सोबत घेऊन समरसता दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मणिपूर च्या पुणे स्थित नागरिकांची संस्था AMAND चे सदस्य सहभागी झाले होते.
