Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

देश बलवान करायचा असेल, तर सेना बलवान व्हायला हवी – ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र खरे यांचे मत

पुणे : आजच्या युवकांना सैन्याचे धडे द्यायला हवे. आपल्याला मागील ७५ वर्षांमध्ये अहिंसेचे डोस पाजले गेले. ज्याच्याकडे शक्ती आहे, त्याला शांततेबद्दल बोलण्याचा अधिकार आहे. भारताला बलवान करायचे असेल, तर आपली सेना अधिकाधिक बलवान व्हायला हवी, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र खरे यांनी व्यक्त केले.

विधायक पुणे, सैनिक मित्र परिवार व सहयोगी संस्थांतर्फे देशासाठी प्राणांची आहुती देणाºया शहीद व बेपत्ता सैनिकांच्या वीरपत्नींसमवेत सदाशिव पेठेतील नारद मंदिर येथे भाऊबीज साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय वायुदलातील निवृत्त ग्रुप कॅप्टन सुहास फाटक, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे समन्वयक भालचंद्र कुंटे, अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर, नारद मंदिराच्या विश्वस्त जयश्री देशपांडे, आनंद सराफ आदी उपस्थित होते.

तिरंगी उपरणे, मिठाई, दिवाळीच्या भेटवस्तू देऊन वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला. सन १९६२, १९६५, १९७१ आणि कारगिल च्या युद्धात बेपत्ता व शहीद झालेल्या सैनिकांच्या वीरपत्नी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. पुण्यातील गणेशोत्सव मंडळे आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग होता. किरण पाटोळे, गिरीश पोटफोडे, अमोल काळे, शिरीष राणे, शाहीर हेमंत मावळे, कल्याणी सराफ, मंदार रांजेकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला.

रवींद्र खरे म्हणाले, अनेक सैनिकांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले आहेत. त्यांच्या प्राणात ख-या अर्थाने भारत सामावला आहे. जगातील अनेक देश आपल्या पुढे आहेत. आपण मागे आहोत, याचे कारण आपल्या सैन्यातील काम आपल्याला माहित नाही. त्यामुळे सैन्यदलातील कार्य सामान्यांपर्यंत पोहोचायला हवे.

भालचंद्र कुंंटे म्हणाले, सैनिकांचे कार्य तर अतुलनीय आहेच, मात्र त्यांच्या वीरपत्नी या त्यागमूर्ती आहेत. त्या सैनिकांच्या पाठिमागे संपूर्ण कुटुंब सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून समाजाला खरी स्फूर्ती मिळेल.

आनंद सराफ म्हणाले, देशाच्या रक्षण करणा-या सैनिकांच्या वीरपत्नी त्यांच्या मागे प्रपंचाची दुसरी लढाई लढत आहेत. त्यामुळे सैनिक मित्र परिवारसह इतर अनेक संस्थांच्या माध्यमातून आम्ही २००० सालापासून त्यांच्या सोबत आहोत, असेही त्यांनी सांगितले. सुहास फाटक, शकुंतला खटावकर व वीरपत्नी, वीरकन्यांनी मनोगत व्यक्त केले. गिरीष पोटफोडे यांनी सूत्रसंचालन केले. नितीन पंडित यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading