दुर्दैवी घटना : पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी एकाचा मृत्यू
पुणे:दीपावलीनिमित्त गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आज मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या आसपास एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवर पुण्याहून दानापूरच्या दिशेने जाणारी गाडी आली. गाडी येताच स्थानकावरील प्रवाशांनी गाडीत चढण्यासाठी एकच गर्दी केली. त्यातच एक प्रवाशी खाली पडला. परंतु, खाली पडलेल्या प्रवाशाला उचलण्याऐवजी लोक त्याला चेंगरून रेल्वेत चढले. यात त्या प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

बोधा मांझे असे या चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशाचे नाव आहे. हा प्रवाशी मूळचा बिहार येथील पाटणा जिल्ह्यातील रहिवाशी आहे. तो शनिवारी पुणे-दानापूर एक्सप्रेसने घरी जण्यासाठी निघाला होता. पुणे स्थानकावर सध्या दिवाळीच्या हंगामुळे मोठी गर्दी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या दिवाळीचा हंगाम असल्याने पुणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी आहे. अनेक नागरिक आपल्या घरी जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर गर्दी करत आहेत. पुणे-दानापूर एक्सप्रेसमध्ये चढण्यासाठी रात्री ९ च्या सुमारास प्रवाशांनी गर्दी केली. या गर्दीत गाडीत चढण्याचा प्रयत्न करत असताना बोधा मांझे हा खाली पडला. दरम्यान, अनेक प्रवाशी हे त्यांच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. नक्की ही घटना कशामुळे घडली याचा पोलिस तपास करत आहेत.
