fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

शहरात पाणी साचू नये यासाठी आवश्यक कार्यवाही करा – चंद्रकांत पाटील


पुणे : कमी कालावधीत अधिक पाऊस झाल्यास शहरात पाणी साचू नये यासाठी आवश्यक कार्यवाही त्वरित सुरू करावी आणि येत्या जूनपर्यंत यासंबंधीची सर्व कामे पूर्ण करावीत अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाला केल्या.

पुणे महानगरपालिकेत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुमार खेमनार, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, हेमंत रासने यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, कमी वेळेत अधिक पाऊस झाल्यास रस्त्यावर पाणी साचण्याच्या कारणांचा स्वतंत्र यंत्रणेमार्फत अभ्यास करून उपाययोजना कराव्यात. नाला रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षक भिंतीसह आधार भिंत (रिटेनिंग वॉल) आदी पर्यायांवर विचार करावा. त्यासाठी लागणारा निम्म्या खर्चासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, त्याबाबत सहकार्य करण्यात येईल. सर्व उपाययोजना पुढील जून महिन्यापूर्वी पूर्ण कराव्यात.

शहरातील ४०० किलोमीटर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निविदाप्रक्रिया त्वरित करण्यात यावी. पाऊस बंद होताच कामांना त्वरित सुरुवात करावी. रस्त्यांच्या कामांचा दर्जा उत्तम राहील याची दक्षता घ्यावी, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

अर्जेंटिना येथील सी ४० जागतिक महापौर परिषदेत पुणे शहराला इलेक्ट्रिक बसेसच्या वापरातील पुढाकार आणि सार्वजनिक वाहतुकीत प्रदूषण मुक्त यंत्रणा वापरासाठी सी ४० सिटीज ब्लूमबर्ग फिलानथ्रोपीज पुरस्कार २०२२ मिळाल्याबद्दल श्री. पाटील यांनी महापालिकेचे अभिनंदन केले.

मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी सादरीकरणाद्वारे महानगरपालिकेच्या प्रकल्पांविषयी माहिती दिली. समान पाणी पुरवठ्यासाठी १२ विभागातील कामे आणि ७५० किमी जलवाहिनीची कामे पूर्ण झाले आहे. एकूण ९८ हजार मीटर बसविण्यात आली असून ४२ टाक्यांची कामेही पूर्ण झाली आहेत. मार्च २०२३ पर्यंत ६० विभाग कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. ७ रस्ते आणि २ पुलाचे काम सुरू आहे. येरवडा गोल्फ क्लब उड्डाणपुलाचे काम डिसेंबर २०२२ अखेर पूर्ण होईल. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत २ हजार ९१८ सदनिकांचे बांधकाम लवकरच पूर्ण होईल.

बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी समान पाणी पुरवठा, राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत मुळा-मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रित करणे, रस्ते विकास, उड्डाणपूल प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना, घनकचरा व्यवस्थापन, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, नगर नियोजन, पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात समाविष्ट झालेल्या २३ गावांचे नियोजन, कर आकारणी व कर संकलन, अनधिकृत बांधकामांना प्रतिबंध, महापालिकेचे प्रस्तावित प्रकल्प या विषयांची माहिती घेतली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading