Saturday, August 29, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पंधरा संशोधकांचा समावेश

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणवले जाते याचा अजून एक दाखला मिळाला आहे. नवीन संशोधन करण्यासाठी ज्यांच्या संशोधन साहित्याचा संदर्भ अनेकदा वापरला जातो अश्या जगातील दोन टक्के प्रतिभावान शास्त्रज्ञांची यादी स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि एल्सवेअर या विज्ञान आधारित साहित्य प्रकाशित करणाऱ्या प्रकाशन संस्थेकडून प्रसिध्द करण्यात आली आहे. या प्रतिभावान शास्त्रज्ञांच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पंधरा संशोधकांचा समावेश आहे.

एल्सवेअर कडून याची माहिती नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार विज्ञान क्षेत्रातील २२ विषयात काम करणारे हे शास्त्रज्ञ असून १७६ उप विषयात यांच्या कामाचे वर्गीकरण करण्यात आले आहे. २०२१ या वर्षाच्या डेटावर ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये जगभरातील दोन लाख पेक्षा जास्त शास्त्रज्ञांचा यामध्ये समावेश आहे.

या यादीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ.भूषण पटवर्धन, डॉ. वर्षा गेज्जी- दफ्तरदार, डॉ.स्मिता झिंजर्डे, डॉ.सुमित दास, डॉ.राजेश गच्चे, डॉ.विश्वास काळे, डॉ.सुभाष पाध्ये, डॉ. बालाप्रसाद अलकमवार, डॉ.विकास मठे, डॉ.सुरेश जुंगारी, डॉ.हबीब पठाण, डॉ.अमन शर्मा, डॉ.अविनाश खरे, डॉ.श्रीधर गद्रे, डॉ.आर.सी.कांबळे आदी संशोधक प्राध्यापकांचा समावेश आहे.

विद्यापीठाचे भविष्य उज्ज्वल आहे

कोणत्याही विद्यापीठात होणारे संशोधन हे त्या विद्यापीठाचा आत्मा आहे असे म्हणतात. विद्यापीठात इतक्या उच्च दर्जाचे संशोधक आणि प्राध्यापक असतील तर नक्कीच त्या विद्यापीठाचे भविष्य उज्ज्वल आहे असेच म्हणावे लागेल. विद्यापीठातील या संशोधकांचे मनापासून अभिनंदन..!! भविष्यात जागतिक दर्जाचे अधिकाधिक संशोधक विद्यापीठात घडो हीच अपेक्षा.

-डॉ.कारभारी काळे (कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

विद्यापीठात चालणारे संशोधन जागतिक दर्जाचे आहे हे सिद्ध

स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या यादीत आपल्या विद्यापीठाच्या पंधरा संशोधकांनी मिळवलेले स्थान ही बाब विद्यापीठात चालणारे संशोधन जागतिक दर्जाचे आहे हे सिद्ध करणारी आहे. ही संशोधकांची यादी भविष्यात वाढत जाणार याचा विद्यापीठाला विश्वास आहे.

– डॉ.संजीव सोनवणे (प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading