चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा – मराठी क्रांती मोर्चा
पुणे : विषप्राशन करण्यापूर्वी फेसबुक लाईव्हमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी म्हटले की, गेल्या काही दिवसांमध्ये माझ्यावर चुकीचे आरोप झाले. त्यामुळे माझी नाहक बदनामी केली. मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर माझ्याविरोधात काम सुरू आहे. हे माझे शेवटचे फेसबुक लाईव्ह आहे. मागील काही दिवसांपासून ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. चंद्रकांत पाटील यांना उपसमितीच्या अध्यक्षपदी घेतले. मी त्यांच्या नावाला विरोध केल्याने त्यांच्या माणसांनी मला त्रास देवून बदनाम केले. त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे, असे म्हटंले होते. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांच्या विरुद्ध मराठी क्रांती मोर्चा आक्रमक झाला असून. चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चा चे अध्यक्ष प्रदीप कणसे यांनी केली.
या पत्रकार परिषदेला शिवसंग्रामचे प्रवक्ते तुषार काकडे, प्रमोद अरसूळ ,रूपाली पाटील उपस्थित होत्या. प्रदीप कणसे म्हणाले,सदरील ऑडियो क्लिपमुळे काही गंभीर विषयांना वाचा फुटली आहे. ४२ मराठा समाजबांधवांच्या आत्महत्यांमुळे तत्कालीन सरकारवर निर्माण झालेला प्रचंड मोठा दबाव आणि चीड कमी करण्यासाठी ठौक मोर्चातील नेते आणि तत्कालीन मंत्री यांच्यामध्ये प्रचंड मोठी आर्थिक देवाणपेवाण झाल्याचे त्या ऑडियो क्लिपमधून उघड झाले आहे. सदरील ऑडिओ क्लिपबाबत उच्चस्तरीय तपास व्हावा आणि दोषी आढळून येणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीची निवेदने ठिकठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्र्यांना देण्यात आली आहेत.
मराठा समाजासाठी आवाहन
२०१६ साली राज्यभरात जिल्हानिहाय निघालेल्या मराठा क्रांती मोर्चामध्ये गोळा झालेला समाजनिधी व त्याचा विनियोग याबाबतचा जमाखर्चाचा हिशेब सर्व समन्वयकांनी समाजासमोर मांडावा.
