‘दिवाळीपहाट-भक्तिरंग’ मध्ये अनुभवायला मिळणार पंडित श्रीनिवास जोशी आणि विराज जोशी यांचे गायन
पुणे : ‘दिवाळी पहाट – भक्तिरंग’ या संगीतमय मैफलीच्या माध्यमातून पुणेकरांना संत रचनांवर आधारित भक्तीसंगीताचा आस्वाद घेता येणार आहे. कलाश्री संगीत मंडळ आणि औंध सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा सांगीतिक कार्यक्रम २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ५:३० वाजता औंध येथील पंडित भीमसेन जोशी कलादालन येथे होणार आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे.
या दिवाळी पहाट कार्यक्रमात भारतरत्न पंडित भीनसेन जोशी यांचे पुत्र गायक पंडित श्रीनिवास जोशी आणि नातू विराज जोशी यांचे गायन होणार आहे. त्याचबरोबर पंडित सुधाकर चव्हाण यांच्या कन्या व शिष्या गायिका शास्वती चैतन्य आणि गायक अभयसिंह वाघचौरे हे कलाकारही यावेळी आपली कला सादर करतील. मुख्य कलाकारांना हार्मोनियमवर गंगाधर शिंदे, तबल्यावर पांडुरंग पवार आणि पखावजावर गंभीर महाजन साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश थिटे करणार आहेत, अशी माहिती फाऊंडेशन’चे अध्यक्ष अभिजित गायकवाड यांनी दिली.
