लेखन आणि चित्रकला अभिनयाला संपन्न बनवते – विक्रम गोखले
पुणे : ” रंगभूमी अथवा कॅमेरासमोर अभिनेता/ अभिनेत्री म्हणून वावणाऱ्या व्यक्तीस ६४ कलांचे ज्ञान असायलाच हवे, हा नाट्यशास्त्रातील नियम आहे. याच ६४ कलांमधील कला म्हणजे चित्र रेखाटणे आणि लेखन. एखादे पात्र,प्रसंग साकारत असताना त्याच्या प्रतिमा तयार करण्यासाठी, लेखकाने जे लिहलंय ते उत्तमरीत्या समजून घेण्यासाठी या दोन्ही कला उपयुक्त ठरतात. त्यामुळेच लेखन आणि चित्रकला या अभिनयाला संपन्न बनवतात.” असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले.
वास्तुविशारद शिरीष दसनूरकर लिखित ‘शिरीषरंग’ पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते शनिवारी टिळक रस्ता येथील ज्योस्त्सना भोळे सभागृह येथे झाले. यावेळी बेलवलकर हाउसिंग चे संचालक समीर बेलवलकर, दसनूरकर असोसिएट्स’ चे रोहित दसनूरकर, मधुरा दसनूरकर आणि शिरीष दसनूरकर यांच्या पत्नी आरती दसनूरकर उपस्थित होते. वास्तुविशारद म्हणून ३६ वर्षांचा समृद्ध अनुभव असलेल्या दसनूरकर यांच्या ‘ दसनूरकर असोसिएट्स’ या फर्मच्या स्थापनेपासूनच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या कॉफी-टेबल बुक आणि दसरनूरकर यांच्या शिरीषरंग आणि शिरीषवारी या पुस्तकांच्या ऑडियो बुकचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
गोखले म्हणाले,” नाट्यशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध चित्रकारांची चित्रे तसेच दर्जेदार साहित्याचे आवर्जून वाचन केले पाहिजे. त्यातून ते नाट्यशास्त्रचे प्रभावी धडे गिरवू शकतील.”
दसनूरकर म्हणाले,” लॉकडाऊन काळात मी हे लेखन केले असून, अतिशय सहज आणि सोप्या भाषेत लिहण्याच्या प्रयत्न मी याद्वारे केला असून, रोजच्या जीवनातील विषयावर आधारित हे लेखन आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले. संदीप देसाई यांनी आभार मानले.
