बंदीजनां च्या जीवनावरील दिवाळी अंकाचे प्रकाशन संपन्न
पुणे : डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन यांच्या वतीने यंदा कारागृह आणि कैद्यांचे जीवन या विषयाला समर्पित चांगुलपणाची चळवळ या दिवाळी अंकाचे प्रकाश येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे बंदी बांधवांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या केंद्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ.ज्ञनेश्वर मुळे, निवृत्त ले. जनरल राजेंद्र निंभोरकर, महाराष्ट्र राज्याच्या कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे,भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई, कारागृह अधीक्षक शिवशंकर पाटील, कारागृह प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रमणी इंदुरकर, येरवडा खुले कारागृहाचे अधीक्षक अनिल खामकर ,पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, संपादिका शुभांगी मुळे, नितीन मुळे आदी मान्यवर उपस्थित होते .
याप्रसंगी कार्यक्रमाचे संयोजक डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी बोलताना सर्जनशीलता ,सकारात्मकता आणि सर्वसमावेशकता या त्रिसूत्रींवर आधारित चांगुलपणाची चळवळ ही बंदी जनांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल आणि कारागृह विभागाचे ब्रिदवाक्य सुधारणा आणि पुनर्वसन हे सार्थ ठरवण्यासाठी हा दिवाळी अंक एक महत्त्वाचे वळण ठरेल असे प्रतिपादन केले.
प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजेंद्र निंभोरकर यांनी मुळे फाउंडेशन करीत असलेल्या या अतिशय सकारात्मक आणि वेगळ्या उपक्रमाचे कौतुक करून यातून समाजाने बंदीजन पुनर्वसनासाठी पुढे येऊन या विषयात काम करणाऱ्या व्यक्तींना, संस्थांना तसेच कारागृह प्रशासनाला मदत करावी असे आवाहन केले . या दिवाळी अंकाच्या संपादिका सौ शुभांगी मुळे यांनी या अंकाच्या निर्मितीमागचा प्रवास उलगडून सांगितला .याप्रसंगी अतिरिक्त पोलीस अधीक्षक पुणे ग्रामिण श्री मितेश घटे यांनी गजाआडचे जीवन या विषयावर मार्गदर्शन केले.
कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी बंदीजनांच्या सुधारणा आणि पुनर्वसनासाठी समाजातील अनेक संस्था पुढे येत आहे याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून याची व्यापकता वाढण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले.
भोई प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी कार्यक्रम चे सूत्रसंचालन केले. येरवडा कारागृहाचे अधीक्षक शिव शंकर पाटील यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
