Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

भरत नाट्य संशोधन मंदिराचे सांस्कृतिक उपक्रम पुन्हा सुरू

पुणे : भरत नाट्य संशोधन मंंदिर ही नाट्यक्षेत्रातील 128 वर्षे अखंडपणे सुरू असलेली संस्था असून रंगकर्मी या संस्थेला मातृसंस्था असंही संबोधतात. संस्थेचे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम कोव्हिड काळातील दोन वर्षांच्या बंदी नंतर नव्या जोमाने सुरू होत आहेत. वासंतिक सांस्कृतिक महोत्सव, स्वस्त नाटक योजना, नाट्य प्रशिक्षण वर्ग त्याचबरोबर नृत्य, गायन, वादन, अभिवाचनाचे कार्यक्रमही आयोजित केले जातात, अशी माहिती अध्यक्ष पांडुरंग मुखडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या प्रसंगी उपाध्यक्ष महेश पाटणकर, कार्याध्यक्ष अभय जबडे, कार्यवाह संजय डोळे, विश्वस्त प्रदीप रत्नपारखे, अविनाश ओगले, विश्वास पांगारकर, राजन कुलकर्णी उपस्थित होते.

अतिशय नाममात्र दारात दर्जेदार नाटके दाखविणाऱ्या स्वस्त नाटक योजनेची यावर्षीची सभासद नोंदणी सुरू झाली आहे. नोव्हेंबर 2022 ते मार्च 2023 या कालावधीत एकूण 5 नाटके केवळ 1000/- (ह्यात प्रत्येक सभासदास 2 प्रवेशिका) अशा अत्यल्प शुल्कात रसिकांना दाखवली जाणार आहेत. संस्थेची निर्मिती असणारी गद्य वा संगीत, किंवा इतर हौशी नाट्यप्रेमींनी बसवलेली नाटके या योजनेअंतर्गत दाखवली जातात. अविनाश ओगले,  राजन कुलकर्णी या योजनेचे संचालक म्हणून काम बघत आहेत. सभासद नोंदणी संस्थेच्या कार्यालयात सुरू आहे.

सुमारे 5 महिने कालावधी असणाऱ्या नाट्य-प्रशिक्षण वर्गाचे प्रवेश सध्या सुरू आहेत. वर्ग दर शनिवार व रविवार संध्याकाळी असतात. नाट्य-विद्यालयाचा कार्यभार विश्वास पांगारकर, संजय डोळे पहात आहेत. नाट्यविषयक सर्व अंगांची प्राथमिक माहिती, वाचन व अभिनय संस्कार, तांत्रिक प्रशिक्षण आणि एकांकिका बसवण्यासारखे उपक्रम या निमित्ताने विद्यार्थ्यांना समृद्ध करतात. संस्थेतर्फे विविध स्पर्धांतून सहभागाची संधीही रंगकर्मी विद्यार्थ्यांना दिली जाऊ शकते.

संस्था दर महिन्याला एक याप्रमाणे कांही अनवट कार्यक्रम प्रेक्षकांसाठी विनामूल्य सादर करते. ज्यात काव्यवाचन, नृत्य, गायन, एकपात्री, वाद्यवादन, अभिवाचन इत्यादी कार्यक्रम सादर होतात. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत कार्यक्रम सादर करण्यासंदर्भात सांकृतिक कार्यक्रम प्रमुख राजेंद्र उत्तुरकर किंवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संबंधित कलाकार संपर्क करू शकतात.

याखेरीज संस्थेचे ग्रंथालय अनेक कलाविषयक संदर्भ ग्रंथ, नाटकांच्या संहिता अशा पुस्तकांनी समृद्ध आहे. अनेक अभ्यासकांना डॉक्टरेट मिळवताना संस्थेच्या ग्रंथालयाची अनमोल मदत झाली आहे, होत आहे. नृत्य-गायन-तबला विषयक वर्गही संस्थेमार्फत चालविले जातात. पांडुरंग मुखडे (तबला), बिल्वा द्रविड (सुगम/शास्त्रीय गायन), मुल्ला सर (नृत्य) सदर वर्गांचे संचालक आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading