12 ते 21 ऑक्टोबर या कालावधीतच फटाके विक्री करता येणार; नियमावली जाहीर
पुणे : दिवाळीत आतीषबाजीसाठी पुणे पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे. तर फटाके विक्री दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात फटाका विक्री दुकाने थाटण्यात आली आहेत. तर,फटाका विक्री स्टाॅल परिसरात आतीषबाजी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
यावर्षी 12 ते 21 ऑक्टोबर या कालावधीतच फटाके विक्री करता येणार आहे. तसेच विक्री करताना व फटाके फोडताना कोणताही धोका अथवा अपघात होऊ नये यासाठी पुणे पोलिसांनी नियमावली जाहीर केली.
1) कागदी स्फोटक पदार्थ ठेवलेले व त्याभोवती 42.534 ग्रॅम वजनाचा 5.715 सेमी लांबीचा 3.175 सेमी व्यासाचा दोरीने गुंडाळलेला अॅटम बॉम्ब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या उत्पादनावर जवळ बाळगणा-यावर आणि विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
2) 21 ऑक्टोबर नंतर म्हणजे विक्रीची मुदत संपल्यानंतर फटाके अथवा शोभेची दारू यांची विक्री करता येणार नाही. तसेच शिल्लक राहिलेले फटाकेचा साठा हा परवाना असलेल्या गोदामामध्ये किंवा घाऊक परवाना धारण करणा-याकडे परत करणे आवश्यक आहे.
3) पोलीस आयुक्तालयाचे परिक्षेत्रामध्ये कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्यापासून 10 मीटर अंतराचे आत कोणत्याही प्रकारची शोभेची दारू अगर कोणत्याही नावाने ओळखले जाणारे फटाके फेकणे, सोडणे किंवा सोडण्यास मनाई आहे.
4) सणांच्या वेळी मोठया आवाजाचे फटाके उडविल्यामुळे निर्माण होणारे ध्वनी व हवा प्रदुषणाचे जनतेवर होणारे संभाव्य अपायकारक परिणाम टाळण्यासाठी असे फटाके वाजविण्यावर निर्बंध आहेत.
5) एखादा फटाका उडविण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरावर 125 डेसीबल आवाज निर्माण करणा या फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापर यावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येते.
ध्वनिप्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत मनाई करण्यात आली आहे. मात्र, जे फटाके विविध रंग निर्माण करतात. आवाज करत नाहीत, असे फटाके रात्री दहा वाजल्यानंतर फोडण्यास मुभा देण्यात आली आहे. याबाबत केंद्र शासन; तसेच राज्य शासनाने आदेश दिले आहेत. या आदेशाचे नागरिकांनी पालन करावे. असे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.