स्वरनाद उपक्रमात घेता येणार गायन आणि संतूर वादनाचा आनंद
पुणे : स्वरझंकार म्युझिक अकादमी आणि अनहदनाद फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेण्यात आलेल्या स्वरनाद या उपक्रमातील पहिला कार्यक्रम येत्या शुक्रवारी म्हणजेच दिनांक १४ ऑक्टोबर रोजी टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात सायंकाळी ६ वाजता संपन्न होईल. कार्यक्रमात निनाद दैठणकर यांचे संतूर वादन आणि सौरभ काडगावकर यांचे गायन ऐकण्याची संधी रसिकांना मिळणर आहे. निनाद हे जेष्ठ संतूर वादक डॉ. धनंजय दैठणकर यांचे शिष्य व सुपुत्र आहेत. तर सौरभ पंडित रघुनंदन पणशीकर यांचे शिष्य आहेत. प्रमुख कलाकारांना आशय कुलकर्णी आणि प्रणव गुरव तबल्यावर आणि अमेय बिछु हार्मोनियमवर साथ करतील. कलाकार आणि संगीतप्रेमी समुदायांनी एकत्र येऊन शास्त्रीय संगीतातील नव्या पिढीच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यावे या हेतूने या उपक्रमात पुढील एका वर्षात अशा प्रकारच्या एकूण सहा संगीत मैफिली आयोजित करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे आयोजक राजस उपाध्ये आणि सानिका कुलकर्णी यांनी नमूद केले.