fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

केवळ मोठा रस्ता व दत्तमंदिर या दोन खुणांवरून पोलिसांनी शोधले 70 वर्षीय आजीचे घर

मौनीबाबा आश्रमातील कर्मचाऱ्यांची पोलिसांनी घेतली मदत

पिंपरी  : केवळ मोठा रस्ता आणि दत्तमंदिर या दोन खुणांवरून चिंचवड पोलीस व आकुर्डीतील मौनीबाबा आश्रमच्या पदाधिकाऱ्यांनी पाच दिवसात 70 वर्षीय आजीला आपल्या घरी सुखरूप पोहोचविले. आजीला पाहताच कुटुंबियांच्या जीवात जीव आला. गंगुबाई भगवान पंडित असे या आजीचे नाव आहे.

रस्ता चुकलेल्या एका 70 वर्षीय महिलेला काही मुलांनी चिंचवड पोलीस ठाण्यात आणून सोडले. पोलिसांनी वारंवार विचारूनही आजीला घराचा पत्ता सांगता येईना. फक्त त्या एक मोठा रस्ता आहे आणि दत्तमंदिर एवढाच पत्ता सांगत होत्या. पोलिस चिंचवडगाव परिसरातील मोठ्या रस्त्यालगतची काही दत्तमंदिरांच्या परिसरात आजीला घेऊन गेले. मात्र, आजीच्या घराचा पत्ता मिळाला नाही. तसेच सर्व पोलीस ठाण्यातील मिसिंग केसेसही तपासल्या. पण कोणत्याच पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल नव्हती. शेवटी पोलिसांनी आकुर्डीतील मौनीबाबा आश्रमाला विनंती करून आजीला तेथे ठेवले.

तेथेही आजी स्वस्थ बसत नव्हत्या. शेवटी पोलिसांनी पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे, पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष कमलजीत सिंग, मौनीबाबा आश्रमाचे जगमोहन धिंग्रा, गौतम भगत, मन्ना सिंग, गुर्जीत सिंग, हरीश सिसोदिया यांनी आजी सांगत असलेल्या मोठ्या रस्त्यालगतचे दत्त मंदिर शोधण्याचा निर्णय घेतला. वाल्हेकरवाडी, बिजलीनगर परिसरातील दत्त मंदिरामध्ये या आजी दर्शनासाठी येत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. त्यानुसार आणखी काही नागरिकांकडे चौकशी केली असता आजीचा मुलगा भेटला. त्यानेही गेल्या पाच दिवसांपासून आजीला शोधत असल्याचे सांगितले.

कोणताही ठोस पत्ता नसतानाही एवढ्या मोठ्या महानगरात चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल लावंड यांनी पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष कमलजीत सिंग यांच्या समवेत आजीला सोबत घेऊन संपुर्ण चिंचवड परिसर पिंजून काढला.

शेवटी बिजलीनगर जवळील दगडोबा चाळीतील नागरिकांनी आजींना ओळखले. पोलिसांनी आजीच्या मुलाच्या ताब्यात आजीला दिले व आजींची काळजी घेण्याचे आवाहन केले. या परिसरात नव्यानेच राहायला आल्याने आजीचा रस्ता चुकल्याचे मुलाने सांगितले. पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading