शिवसेना संपवायला शरद पवारच जबाबदार विजय शिवतरे यांचा शरद पवार यांच्यावर आरोप
पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा झटका दिला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेलं धनुष्यबाण तर गोठवलंच पण आता दोन्ही गटांना शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाही. त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अपेक्षित होता. कारण, दोनच दिवसांपूर्वी त्यांनी जो निर्णय येईल.त्याचं स्वागत केलं पाहिजे. असं एक वक्तव्य केले होते. त्यामुळे हे मोठे लोक कुठे काही गेम करतील, सांगता येत नाही. शिवसेना संपवायला शरद पवारच जबाबदार आहेत. असा आरोप माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्यावर केला.
विजय शिवतारे म्हणाले की, विधानसभेची २०१४ ची निवडणूक झाल्यानंतर पवार यांनी भाजपला बिनशर्त पाठींबा दिला होता. तो पाठिंबा म्हणजे पवारांचा एक कट होता. शिवसेना-भाजपचा संसार पवार यांना चालू द्यायचा नव्हता. पवार यांनी कधीच शिवसेनेशी जुळवून घेतलं नाही. पवार यांची मैत्री हिंदूह्रदयसम्राट यांच्याशी असली तरी राजकिय मतभेद होतेच.
उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये खुर्चीच्या मोहापायी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना संपवत पवार यांच्याकडे जाऊन बसले. शरद पवार राज्याच्या राजकारणातील बरमूडा ट्रँगल आहेत. त्यांच्याजवळ गेलेले सगळे संपले आहेत, हा इतिहास आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २०१९ मध्ये एकही उमेदवार नसताना राज ठाकरे यांना पुढे करत ‘लाव रे तो व्हीडीओ’ म्हणायला लावले. गरज संपली की त्यांना झटकून टाकले, असेही शिवतारे म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की, काँग्रेसची पंचसूत्री गाडा आणि माझ्यानंतर उद्धवला सांभाळा. याची आठवण कोणाला आता होत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर असलेली युती तोडा, हे सांगायला १६ आमदार गेल्यानंतर तुम्हाला जायच असेल, तर तुम्हीपण जा, असे उद्धव ठाकरे आमदारांना म्हणाले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने काय भानामती केली, कुणास ठाऊक, असा सवालही शिवतारे यांनी या वेळी उपस्थित केला.
