Wednesday, June 17, 2026
BusinessLatest NewsPUNE

गोखले कंस्ट्रक्शन्सच्या नवरात्र गृह महोत्सवाचे चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

गृह महोत्सवाचे यंदा १०वे वर्ष

शहरातील मोक्याच्या ठिकाणी साकारत असलेल्या गृह प्रकल्पांमध्ये फक्त १०% रक्कम भरून घेता येणार स्वप्नातले घर, उर्वरित ९०% रक्कम प्रकल्प पूर्णत्वाच्या वेळी देता येणार

पुणे :: गरीब नागरिकांसाठी सरकारने परवडणाऱ्या दरात २७० स्केवर फुट घरांचा पर्याय आणला. पण तुलनेने बरी आर्थिक स्थिती असलेल्या नागरिकांना सर्व सोयीसुविधा असलेले थोडे मोठे घर हवे असते. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी अशा लोकांच्या गरजा लक्षात घेऊन घरांच्या निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा असे मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.

पुण्यातील आघाडीची बांधकाम कंपनी असलेल्या गोखले कंस्ट्रक्शन्स तर्फे आयोजित नवरात्र गृह महोत्सवाचे उदघाटन आज प्रभात रस्ता येथील गोखले कंस्ट्रक्शन्सच्या कार्यालयात पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, गोखले कंस्ट्रक्शन्सचे पूनम व विशाल गोखले, माजी नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे,  पुनीत जोशी, महेश पोटे,  बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटीव्ह सोसायटीचे पुणे विभाग प्रमुख सुशील जाधव आणि बुलढाणा अर्बनच्या योगिनी पोकळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “आज भारत देश ही जगातील पाचवी अर्थव्यवस्था झाली आहे. देश मोठा होतो त्याप्रमाणे माणूसही मोठा होणे आवश्यक आहे. तळागाळातील लोकांना फायदा झाला पाहिजे. आजच्या काळात माणसाच्या महत्वाच्या गरजांमध्ये आरोग्य, मुलीचे लग्न आणि घर यांच्या प्रामुख्याने समावेश होतो. यापैकी वैद्यकीय उपचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या कमकुवत स्तरातील कुटुंबियांना वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकिय उपचार घेता येतात. दुसरे म्हणजे मुलींच्या लग्नासाठी अनेक सामाजिक संस्था काम करत आहेत. लवकरच शंकर महाराज मठ येथे पुण्यातील गरीब मुलींची लग्न मोफत स्वरुपात होणार आहेत. घर या प्रश्नावर देखील मोदी सरकारने उत्तर देण्याच्या प्रयत्न केला आहे ते म्हणजे परवडणाऱ्या दरात २७० स्केअर फुटात साकारलेले घर. परंतु आर्थिक परिस्थिती जरा बरी असलेल्यांना थोडे मोठे आणि विविध  सोयीसुविधांनी सज्ज असलेले घर हवे असते. त्यासाठी विशाल गोखले यांच्यासारख्या बांधकाम व्यावसायिकांची भूमिका महत्वाची असते. त्यामुळेच त्यांनी टप्या टप्याने का होईना या गरजा लक्षात घेवून परवडणाऱ्या घरांची निर्मिती करावी असा सल्ला पाटील यांनी यावेळी दिला.

गोखले कंस्ट्रक्शन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले म्हणाले, “गेली ९ वर्षे आम्ही ग्राहकांसाठी नवरात्रात गृह महोत्सव आयोजित करत आहोत. त्याला ग्राहकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळतो. यंदा महोत्सवाच्या दहाव्या वर्षाचे औचित्य साधत आम्ही एक अभूतपूर्व अशी ‘१० – ९०’ योजना सादर करत आहोत. याअंतर्गत नवरात्राच्या ९ दिवसांमध्ये गोखले कंस्ट्रक्शन्सच्या कोणत्याही निवासी किंवा व्यावसायिक प्रकल्पात प्रॉपर्टी घेतल्यास केवळ १० टक्के रक्कम भरून उरलेली ९० टक्के रक्कम ही थेट प्रकल्प पूर्ण झाल्यावर द्यायची आहे. ही योजना जाहीर झाल्यापासून नागरिकांकडून याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे.” गोखले कंस्ट्रक्शन्स’ने सर्वसामान्यांना परवडेल अशी घरे बांधण्यात देखील आपले योगदान दिले असून, आतापर्यंत अशा स्वरूपातील १००० घरे बांधली आहेत. तसेच आगामी काळात सरकारने जागा उपलब्ध करून दिल्यास अशा स्वरुपातील आणखी घरे बांधण्याची आमची तयारी असल्याचेही गोखले यांनी सांगितले. गोखले कंस्ट्रक्शन्सचे शहरातील विविध निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प कर्वे नगर, करिष्मा सोसायटी जवळ कोथरूड, मयूर कॉलनी, डहाणूकर कॉलनी, पटवर्धन बाग, एरंडवणा, प्रभात रस्ता, एमआयटी जवळील गिरीजा सोसायटी, सहकार नगर आणि औंध रोड येथे साकारात आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading