Savitribai Phule Pune University : आजारी विद्यापीठ प्रशासनाच्या उपचारासाठी अभाविपचे रुग्णवाहिका नेऊन प्रतिकात्मक आंदोलन
पुणे : ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी व विधी विद्यार्थ्यांच्या निकालात मोठ्या प्रमाणात समस्या आढळून आल्या आहेत. काहींना शून्य मार्क तर काहींना परीक्षेला उपस्थित राहून देखील अनुपस्थितीतचा शेरा दाखवण्यात आलाय. या विषयावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी विद्यापीठ प्रशासनाशी चर्चा केली. सतत निवेदन देऊन देखील विद्यापीठ प्रशासनाने योग्य ती कार्यवाही केली नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला गेली अनेक महिन्यांपासून पुर्णवेळ कुलगुरू नसल्याने असे गैर प्रकार घडत असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला. तसेच विद्यार्थ्यांवर करणारे विद्यापीठ प्रशासन निर्दयी झाले आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत; या आजारी पडलेल्या प्रशासनाला उपचार देण्यासाठी विद्यापीठ प्रांगणात रुग्णवाहिका नेऊन प्रतिकात्मक आंदोलन केले.
अनेक विद्याशाखांचे निकाल लागून एक महिना होत आला असून अद्यापही निकालात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुधारित निकाल विद्यापीठाने जाहीर केलेला नाही. या सर्व विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यार्थी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणातील मुख्य इमारती समोर आले. परंतु, त्याठिकाणी कुलगुरू तसेच प्र – कुलगुरू दोघेही उपस्थित नव्हते एक तास कार्यकर्ते व विद्यार्थी मुख्य इमारती समोर ठिया मांडून बसले होते. परंतु कोणीच दखल घेतली नाही त्यामुळे काही वेळाने अभाविप ने आंदोलन परीक्षा विभागाकडे वळवले. त्यानंतर परीक्षा विभागाकडे गेल्यावर अभाविप कार्यकर्ते व विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक असणारे डॉ. महेश काकडे यांना घेराव घातला. यावेळी अभाविप प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी परीक्षा नियंत्रक डॉ. महेश काकडे यांना जाब विचारला की, या सर्व प्रकरणात विद्यापीठ प्रशासन केव्हा कार्यवाही करणार? निकालात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांचा सुधारित निकाल कधी जाहीर करण्यात येणार? असे विचारले. त्यावर उत्तराच्या स्वरूपात परीक्षा नियंत्रक डॉ. महेश काकडे यांनी आम्ही कुलगुरूं सोबत या विषयावर बैठक घेऊन संपूर्ण चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन देण्यात आले.
दरम्यान, यावेळी युक्रांत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी देखील याच मंगणीसाठी विद्यापीठात आज आंदोलन केले.
विद्यार्थ्यांच्या मागण्या
- विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू नेमावा
- विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे
- सुधारित निकाल विद्यापीठाने लवकरात लवकर जाहीर करावा
