वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली झाली; पोलीस कर्मचाऱ्यांने दिल्या हटके स्टाईल शुभेच्छा
पुणे : पुणे तिथं काय उणे ही म्हणीची प्रचिती वेळोवेळी विविध माध्यमातून येत असते. मध्यंतरी खडक पोलीस स्टेशनमधील एका कर्मचाऱ्याने चीलापी मासे आणायला जाण्यासाठी सुट्टीचा अनोखा अर्ज लिहलेला होता. ते पत्रदेखील सोशल मीडियावर व्हायरल झालं होते. त्यानंतर आता त्याच पोलीस स्टेशनमधील आणखी एका कर्मचाऱ्याच्या हटके स्टाईल शुभेच्छा सध्या व्हायरल होत आहेत.
पुण्यातील खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असणारे श्रीहरी बहिरट यांची भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली. त्यानंतर खडक पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने व्हॉट्सअपवर हटके स्टाईल आनंद व्यक्त केला आहे.
व्हॉट्सॲप मेसेजमध्ये संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने लिहले आहे की, “साहेब मी तुम्हाला शुभेच्छा देऊ शकतच नाही, तुम्ही बदलून गेलात फार आनंद झाला याचं पण उत्तर लगेच देतो. एक तर आपण कोणालाच रजा सुट्ट्या देत नव्हते मी सरळ आणि प्रामाणिक काम करणारा साधा कर्मचारी होतो. पण आपली एकच भूमिका खडक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना अथवा अंमलदारांना तुमचा स्वभाव आवडला नाही.
तुम्ही तुपासह पाचही पक्वान्न खात होते परंतु इतरांना फक्त कोरडा भात खाऊ घालत होते. त्यामुळे माझ्यासारख्या ज्येष्ठांचा आपल्या पाठीशी कायम आशीर्वाद राहील. आम्हाला म्हाताऱ्या लोकांना खूप त्रास दिला त्याचा तुमच्या बायका पोरांना आशीर्वाद मिळेल. कारण तुम्ही आम्हाला दिलेला त्रास आम्हाला झाला नसून, आमच्या बायका मुलांना झाला आहे. तरीपण पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा साहेब. असा मजकूर या व्हॉट्सॲप मेसेजमध्ये आहे. त्यानंतर आता या मेसेजचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे.
