Tuesday, October 27, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

खासदार संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ

मुंबई : पत्राचाळ प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली असून १९ सप्टेंबरपर्यंत त्यांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत असणार आहे.

२३ ऑगस्ट रोजी मागची सुनावणी झाली होती त्यावेळी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज कोर्टात याप्रकरणी सुनावणी झाली.

ईडीने पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात राऊत यांच्या पत्नीची चौकशी केली असून राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांनासुद्धा अटक करण्यात आली होती. प्रवीण राऊत यांनी या व्यवहारात मिळालेली काही रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या बँक खात्यात वर्ग केली आहे. तसेच त्यातून राऊत यांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याचा आरोप ईडीने केला आहे.

दरम्यान, खासदार संजय राऊत यांना ईडीने ३१ जुलैला ताब्यात घेत अटक केली होती. त्यानंतर त्यांनी आपल्यावरील सर्व आरोपांचे खंडन केले असून राजकीय आकसाने आपल्याविरोधात खोटे आरोप केले जात असल्याचा आरोप केला होता.

Leave a Reply