ग्लोबल गणेशोत्सवांतर्गत सिंगापूरमध्ये ‘दगडूशेठ’ चे बाप्पा विराजमान
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे यंदा राबविण्यात येत असलेल्या ग्लोबल गणेशोत्सवांतर्गत थेट सिंगापूरमध्ये दगडूशेठ गणपतीची हुबेहुब प्रतिकृती असलेले बाप्पा विराजमान झाले आहेत. पुण्यातून आॅगस्ट महिन्यात ही मूर्ती सिंगापूर येथे पाठविण्यात आली होती. तसेच उत्सव मंडपात देखील थायलंडसह विविध देश व गुजरात, कर्नाटक, पंजाब, तामिळनाडू, केरळ, दिल्ली, हरियाणा आदी राज्यातील गणेशभक्तांची गर्दी होत असून ख-या अर्थाने ग्लोबल गणेशोत्सव साजरा होत आहे.
यंदाचे उत्सवाचे १३० वे वर्ष असून महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाकडून राबविण्यात येणा-या उपक्रमाद्वारे उत्सवात परदेशी व भारताच्या विविध राज्यांतील पर्यटक दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सवाला भेट देत आहेत. गणेशोत्सवाचा वारसा आणि संस्कृती जगभरातील लोकांना जाणून घेता यावी आणि ही संस्कृती जगभर पोहोचावी, यासाठी पुण्यातील गणेशोत्सवात राज्याच्या पर्यटन विभागातून परदेशी व विविध राज्यांतील नागरिकांना सहभागी करुन घेतले जात आहे.
याशिवाय महाराष्ट्र मंडळ सिंगापूर आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे तर्फे सिंगापूरमध्ये गणेशोत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धा व कार्यक्रमांत सहभागींना प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित देखील केले जात आहे. साहित्यवाचन, विविध गुणदर्शन, व-हाड निघालय लंडनला असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाचा दगडूशेठ गणपती ट्रस्टचा गणेशोत्सव ग्लोबल उत्सव म्हणून साजरा होत आहे.
