अल्टिमेट खो खो स्पर्धेत तेलगु योद्धाज, गुजरात जायंट्सचा विजयी समारोप
पुणे : पहिल्या अल्टिमेट खो खो स्पर्धेत अखेरच्या साखळी फेरीच्या सामन्यात तेलगु योद्धाज व गुजरात जयंट्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी समारोप केला. तेलगु योद्धाज संघाने ओडिशा जगरनाट्सचा 65-36 असा तर, गुजरात जयंट्स संघाने राजस्थान वॉरियर्स संघाचा 47-42 असा पराभव केला.
शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत आज मैदानात उतरलेल्या खो खो खेळाडूंना युवा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ यांच्याकडून खास प्रोत्साहन मिळले.पृथ्वी शॉ याने सामन्याच्या ठिकाणी उपस्थित राहून अल्टिमेट खो खो लीगमधील रोमांचकारी चुरस आणि चित्तथरारक क्षणांचा आनंद लुटला.
ध्रुव याने 12 गुणांची कमाई करताना तेलगु योद्धाजच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला. तर, केसी धनुष याने 8गुण मिळवुन त्याला उत्कृष्ट साथ दिली.
ओडिशा जगरनट्सकडून आदित्य कुदळे, अर्जुन सिंग आणि मनोज घोटेकर यांनी प्रत्येकी 4गुण मिळवून झुंज दिली.
तेलगु योद्धाजने आक्रमक प्रारंभ करताना पहिल्या डावा अखेर ओडिशावर 28-26 अशी आघाडी घेतली होती. ध्रुवने तीन खेळाडू बाद करताना 9 गुणांचा वाटा उचलला. मात्र त्यानंतर तेलगु योद्धाजने 27 गुणांची भर घालताना सामन्यावर वर्चस्व गाजवले.
ओडिशा जगरनट्स संघाने अंतिम सत्रात पुनरागमन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु सिनामरोखसन सिंग (4.01मि), थोकचोम सदानंद मेटेई(2.59मि) आणि सुदर्शन(2.38मि)यांनी जबरदस्त बचावाचे दर्शन घडवताना तेलगु योद्धाजच्या 65-36 अशा विजयाची पुर्तता केली.
गुजरात जायंट्स(23गुण), ओडिशा जगरनट्स(21गुण), तेलगु योद्धाज(19गुण), चेन्नई क्विक गन्स(15गुण) हे चार संघ प्ले ऑफ साठी पात्र ठरले आहेत.क्वालिफायर आणि एलेमिनीटर शुक्रवारी खेळले जातील, तर क्वालिफायर 2 लढत शनिवारी होणार आहे.अंतिम सामना रविवारी 4 सप्टेंबर रोजी होणार आहे.
पहिल्या सामन्यात वझीर अभिनंदन पाटील ने 8 गुण मिळवून गुजरातच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर, राजस्थानकडून कर्णधार माझहर जमादारने 7 गुण मिकवून एकाकी झुंज दिली.
राजस्थान वॉरियर्सने गुजरातला चुरशीची झुंज दिली.परंतु प्ले ऑफ मधील आधीच स्थान निश्चित केलेल्या गुजरातने सामन्यावरील वर्चस्व कायम राखले. सागर पोतदारने 3मिनिटे 21सेकंद खेळ करताना 4बोनस गुणांची कमाई केल्याने तिसऱ्या सत्राअखेर त्यांनी राजस्थानला 18 गुणांवर रोखले होते.त्यामुळे अखेरच्या सत्रात केवळ 13 गुणांचा बचाव करण्याचे आव्हान राजस्थान समोर राहिले.
निलेश पाटील ने गुजरातला 2मिनिटे बाकी असतानाच विजयी आघाडी मिळवून देताना याल्ला सतीश याला पोल डाईव्ह वर बाद केले. त्यानंतर गुजरातने लगेचच विजय निश्चित केला.
त्याआधी राजस्थानने पहिल्या सत्राअखेर गुजरात च्या आठ खेळाडूंना बबाद करून 20-02 अशी आघाडी घेतली होती. अक्षय गणपुळेने दुसरी सत्रात 2मिनिटे 45सेकंद खेळ करताना 2बोनस गुणांसह राजस्थानकडून झुंज दिली.तरीही गुजरातने मध्य तरला 23-22अशी आघाडी राखली होती.हीच आघाडी कायम राखत त्यांनी साखळी स्पर्धेत विजयाचा समारोप केला.
आज रात्री अखेरच्या साखळी सामन्यात तेलगु योद्धाज विरुद्ध ओडिशा जगरनट्स यांच्यात होणार आहे.
अमित बर्मन यांनी पुरस्कृत केलेल्या अखिल भारतीय खो खो फेडरेशनच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेचे प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर ही लीग पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसारित करण्यात येणार आहे. सोनी टेन 1 (इंग्रजी), सोनी टेन 3 (हिंदी आणि मराठी), सोनी टेन 4 (तेलुगु आणि तमिळ) चॅनेलवरून अल्टीमेट खो खोचे थेट कव्हरेज दररोज संध्याकाळी 7:00 वाजता सुरू प्रसारित करण्यात येणार आहे. लीग प्रीमियम ओटीटी प्लॅटफॉर्म, सोनी लाईव्हवर लाइव्ह-स्ट्रीम देखील करण्यात येणार आहे.
