‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्ट यंदा साजरा करणार ‘ग्लोबल गणेशोत्सव’
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे उत्सवाचे १३० वे वर्षे ; महाराष्ट्र पर्यटन विभाग, आयुष मंत्रालय व वनराईच्या सहकार्याने विविध उपक्रम
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे यंदा ग्लोबल गणेशोत्सव साजरा होणार आहे. यंदाचे उत्सवाचे १३० वे वर्ष असून महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाकडून राबविण्यात येणा-या उपक्रमाद्वारे उत्सवात दहा दिवस दररोज परदेशी पर्यटक दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सवाला भेट देणार आहेत. याशिवाय दहा दिवस उत्सवमंडपात अभिषेक करणा-या २५ हजार भाविकांना ट्रस्टतर्फे प्रसाद म्हणून देशी वृक्षांची रोपे देण्यात येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.
गणेशोत्सवाचा वारसा आणि संस्कृती जगभरातील लोकांना जाणून घेता यावी आणि ही संस्कृती जगभर पोहोचावी, यासाठी पुण्यातील गणेशोत्सवात राज्याच्या पर्यटन विभागातून परदेशी नागरिकांना सहभागी करुन घेतले जात आहे. यासंदर्भात पर्यटन विभागाने ट्रस्टला अधिकृत पत्र पाठविले असून त्यानुसार ट्रस्टने सहमती दर्शविल्याने दहा हा उपक्रम होणार आहे. दररोज २५ ते ३० जणांचा परदेशी नागरिकांचा एक गट गणेशोत्सवात दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या उत्सवाला भेट देणार आहे. आपल्याकडील संस्कृतीचा वारसा आणि गणेशोत्सवातील संस्कृती जाणून घेणार आहेत.
याशिवाय दररोज उत्सव मंडपात अभिषेकाला बसणा-या भक्तांना बकुळ, जास्वंद, चाफा, सदाफुली अशी देशी वृक्षांची २५ हजार रोपे आयुष मंत्रालय भारत सरकार व वनराई यांच्या सहकार्याने देण्यात येणार आहेत. पर्यावरणाचे संवर्धन राखले जावे. यादृष्टीने देशी वृक्षांचा प्रसाद भक्तांना मिळणार आहे. तसेच असंख्य भाविकांच्या मागणीनुसार पंचखाद्याचा मोदक देखील प्रसाद म्हणून यंदा तयार करण्यात आला आहे. खारीक, खोबरे, खडीसाखर, खसखस, खिसमिस आणि कापूर वापरुन दादू स्विटचे मालक ॠषी दादू यांनी हा प्रसाद बनविला आहे. तो देखील उत्सव मंडपात भाविकांसाठी उपलब्ध असणार आहे.
