विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया केव्हा पूर्ण होणार ? – अभाविप
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पस मधील प्रवेश प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू आहे. दरवर्षी या कालावधीत नवीन प्रवेश पूर्ण होऊन प्रत्यक्ष शिकवणे सुरू होते. या दिरंगाई मुळे पुढील शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू होईल ? असा प्रश्न अभाविप कडून उपस्थित करण्यात आला. तत्काळ लांबलेली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून नवीन विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रवेशद्वार शिक्षणासाठी खुले करून द्यावे अशी मागणी अभाविप पुणे विद्यापीठ शाखेकडून करण्यात आली.
कुलगुरू महोदयांना या मागणीचे आज निवेदन देण्यात आले. आता मेरिट लिस्ट लावणे सुरू आहे, त्यात गती आणून ५ सप्टेंबर ते १० सप्टेंबर दरम्यान प्रवेश पूर्ण करून तासिका सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे असे यावेळी अभाविप शिष्टमंडळाला कुलगुरूंनी सांगितले. सदर वेळखाऊ प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, विद्यार्थि विद्यापीठ परिसरात येऊन शिक्षण घेण्यासाठी आतुर आहेत. विद्यापीठातील प्रशासनाने जर तत्काळ लक्ष देऊन प्रवेश पूर्ण केले नाही तर अभाविप तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा आज विद्यापीठ अध्यक्ष महादेव रंगा यांनी दिला. यावेळी अभाविप उपाध्यक्ष पवन निमसे, वसतिगृह प्रमुख अभिषेक पावडे आणि अन्य विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.
