Sunday, September 6, 2026
BusinessLatest NewsPUNE

वर्ल्ड इकोनॉमिक फोरम’तर्फे आयोजित जागतिक परिषदेचे देवयानी पवार यांना निमंत्रण

पुणे : विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून ग्रामीण जीवनात बदल घडविण्यासाठी कार्यशील असलेल्या पुण्यातील देवयानी पवार या तरुण उद्योजिकेला वर्ल्ड इकोनॉमिक फोरम (डब्लूईएफ) या जागतिक संस्थेतर्फे आयोजित ‘ग्लोबल शेपर्स अन्युअल समिट’ या जागतिक परिषदेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. ही परिषद स्वित्झर्लंड येथील जिनिव्हा येथे २ ते ४ सप्टेंबर या कालावधीत होणार असून, जगभरातील ६०० प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहे. देवयानी पवार या ग्लोबल शेपर्स’च्या ‘बारामती हब’ या समाजसेवी संस्थेच्या क्युरेटर म्हणून काम करतात. २०२० मध्ये स्थापन झालेले बारामती हब हा गट ग्रामीण क्षेत्रासाठी कार्यरत असलेला संस्थेचा पहिलाच सुसंघटीत गट आहे. या गटाच्या माध्यमातून जागतिक आरोग्य संघटनेच्या शाश्वत विकास उद्दिष्टाना अनुसरून ग्रामीण भागात स्थानिक प्रशासनाच्या मदतीने विविध उपक्रम राबविले जातात. बारामती हबच्या माध्यमातून केलेल्या कामाची दखल घेत पवार यांना सदर परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

याबाबत देवयानी पवार म्हणाल्या, “बारामती हबच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत २० उपक्रम राबविले आहेत. हे उपक्रम चांगले आरोग्य आणि लोककल्याण, स्वच्छता आणि शुद्ध पाणी, शाश्वत शहरे आणि लोकसमूह, हवामान बदल कृती आणि पृथ्वीवरील जीवसृष्टी अशा विविध धोरणांना अनुसरून राबविले जात आहेत. बारामती हबच्या उल्लेखनीय उपक्रमांमध्ये सॅनिटरी पॅडचे वाटप आणि वृक्षारोपण मोहीम यांचा समावेश आहे. संस्थेने २०२० पासून झोपडपट्ट्या, गावे आणि ग्रामीण भागात १२ ते ४० वर्षे वयोगटातील १५०० पेक्षा जास्त महिलांना तब्बल ४००० हून अधिक सॅनिटरी पॅड वितरित केले असून, अजुनही हे कार्य सुरु आहे. त्याचबरोबर वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ९०० पेक्षा जास्त देशी झाडांचे रोपण आणि दुष्काळग्रस्त वनजमिनीवर १०० सीड बॉल टाकले आहेत. या प्रकल्पामुळे हरित संपदेत वृद्धी होण्यास मदत होत आहे.”

“बारामती हबने मानसिक आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, हवामान बदल आणि जैवविविधता संरक्षण यांसारख्या क्षेत्रातही काम केले आहे. जागतिक परिषदेतील सहभागाबाबत देवयानी म्हणाली, “ ग्लोबल शेपर्स या जागतिक परिषदेत मी ३० वर्षाखालील युवा नेत्यांच्या मंचावर ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही माझ्यासाठी मोठी संधी असून, यामध्ये सहभागी होण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे. परिषदेत मी ग्रामीण भागात लोकांसोबत काम करताना मला आलेले अनुभव मांडणार आहे. ग्रामीण भागातील तरुण, स्थानिक प्रशासन आणि खाजगी संस्थांना एकत्र आणत राबविलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसमावेशक, प्रगतीशील आणि विकसित समाज घडवू शकतो. असा मला विश्वास आहे. परिषदेत डब्लूईएफ’चे संस्थापक क्लॉस श्वाब आणि ग्लोबल शेपर्स कम्युनिटीच्या प्रमुख नताली पियर्स यांनी मांडलेले विचार माझ्या भविष्यातील प्रवासात महत्त्वपूर्ण ठरतील”, असे पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading