fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNE

जीवनशैलीच्या संतुलनासाठी आयुर्वेद आणि अध्यात्म समाजून घेतले पाहिजे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

कार्ला  : अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथीमध्ये या वैद्यकशस्त्रात केवळ शारीरिक व्याधीबाबत विचार केला जातो. मात्र आयुर्वेद हे त्याहून पुढे जात शरीरातील आत्माच्या शुद्धीबाबत उपचार प्रदान करते. आयुर्वेद शारीरिक उपचारांबरोबरच मानसिक उपचार आणि अध्यात्मिक उत्थान देखील करते. त्यामुळेच आयुर्वेद, योग, ध्यान, अध्यात्म यांचे महत्व जाणून घेत, आपली जीवनशैली संतुलित केली पाहिजे, असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. आयुर्वेद तज्ज्ञ पद्मश्री श्रीगुरु डॉ.बालाजी तांबे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. संतुलन आयुर्वेद व बालाजी तांबे फाउंडेशनतर्फे आयोजित हा कार्यक्रम कार्ला येथील आत्मसंतुलन व्हिलेज येथे संपन्न झाला.

याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, बालाजी तांबे फाउंडेशन’च्या अध्यक्षा वीणा तांबे, बालाजी तांबे हेल्थकेअरच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. मालविका तांबे, संतुलन आयुर्वेदाचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक सुनील तांबे , संतुलन आयुर्वेदाचे जर्मनीतील व्यवस्थापकीय संचालक संजय तांबे उपस्थित होते. आयुर्वेद, संतुलित जीवन प्रणाली आणि भारतीय संस्कृती यांचा जगभरात प्रचार व प्रसार करणारे श्रीगुरु डॉ. तांबे यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, “ भारतीय उपचार पद्धती असलेल्या आयुर्वेदाचे महत्व परदेशामध्ये वाढत आहे. भारतातील अनेक वैद्य हे ही उपचार पद्धती शिकून परदेशात त्याचा अवलंब करत आहेत. आत्मशांतीसाठी सांगण्यात आलेल्या योग, ध्यानधारणा यांचा अंगीकार तेथील नागरिक करत आहेत. मात्र आपल्याच देशात या उपचार पद्धतीकडे म्हणावे तसे महत्व दिले जात नाही. संतुलित आणि सुदृढ जीवनशैलीसाठी आयुर्वेद, योग, ध्यान, अध्यात्म हे अतिशय  महत्वाचे आहेत.’’

आपल्या वैयक्तिक आयुष्यात आयुर्वेद आणि योगमुळे झालेल्या फायाद्याबाबत सांगताना कोश्यारी म्हणाले, “ मला डोकेदुखीचा प्रचंड त्रास होत होता. अनेक औषधोपचार करूनही ते कमी झाले नव्हते. मात्र आयुर्वेदिक वैद्याने सांगितलेल्या उपचारांचे पालन केल्यानंतर तो त्रास कमी झाला. तसेच योगमुळे शरीर सुदृढ राहण्यास मदत होत असल्यानेच आज मी तुमच्यामध्ये येन इथे बोलू शकत आहे.’’

आयुर्वेद उपचार पद्धतीला घराघरात नेण्याचे काम डॉ. बालाजी तांबे यांनी केले आहे. त्यांचा हा वारसा  डॉ. मालविका तांबे आणि त्यांचे सहकारी सक्षमपणे पुढे चालवतील अशी मला खात्री आहे, असेही कोश्यारी यांनी सांगितले.

श्रीनिवास पाटील म्हणाले, “ डॉ. बालाजी तांबे हे व्यवसायाने आयुर्वेद तज्ज्ञ, शिक्षणाने अभियंता आणि वागणुकीने सामाजिक कार्यकर्ते होते. एक काळ होता जेव्हा इंद्रायणी काठी असलेल्या या आत्मसंतुलन व्हिलेजमध्ये पाण्याची मोठी कमतरता होती. मात्र डॉ. तांबे यांच्या कार्यामुळे नंतरच्या काळात या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यात आनंदआश्रू येत. यामुळेच इंद्रायणी काठीचे हे स्थळ म्हणजे ‘बालाजीची आळंदी’ असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही.’’

श्रीरंग बारणे म्हणाले, “ डॉ. बालाजी तांबे आणि त्यांचे कुटुंबिय यांनी ४० वर्षे आयुर्वेद उपचाराद्वारे माणसाला घडविण्यामध्ये, त्याला जगविण्यामध्ये मोठे योगदान दिले आहे. लोणावळा या पर्यटन स्थळाला आयुर्वेदिक उपचाराचे केंद्र बनविण्याचे काम डॉ. तांबे आणि त्यांच्या कुटुबियांनी केले आहे.’’

सुनील तटकरे म्हणाले, “ डॉ. बालाजी तांबे यांनी देशापुरता मर्यादित असलेला आयुर्वेद हा केवळ जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्याचे काम नाही केले, तर आयुर्वेद ही जगातील एक महान उपचार पद्धती असल्याचे सिद्ध करून दाखविले. रामायण महाकाव्य आणि आयुर्वेद उपचार पद्धती याविषयावर त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यांनी नवीन पिढीला चांगले संस्कार दिले. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार आणि शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे या तर दोन भिन्न विचारधारा असलेल्या राजकीय पक्ष प्रमुखांना याठिकाणी उपचार घेतले होते. वैद्यकशास्राला आव्हान देणारे नवीन नवीन रोग भविष्यात निर्माण झाल्यास त्यावर उपचार शोधण्याचे काम या बालाजी तांबे फाऊडेशनच्या माध्यमातून निश्चित होईल असा मला विश्वास आहे.’’

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मालविका तांबे यांनी केले, तर सुनील तांबे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन वसुंधरा काशीकर यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading