Friday, May 15, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा

मुंबई : कोविडच्या भीतीने राजा बसला घरी, वाझेचे खोके- मातोश्री ओके, लवासाचे खोके-बारामती ओके, अशा घोषणा सत्ताधारी पक्षाने दिल्या. तर गाजर देणे बंद करा, ओला दुष्काळ जाहीर करा, अशा गगनभेदी घोषणा देत विरोधकांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

आज पावसाळी अधिवेशनाला पाचवा दिवस आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर पोस्टर दाखवत एकमेंकाविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी दोन्ही सत्ताधारी-विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली. विरोधकांनी गाजर दाखवत शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.

यावेळी मविआच्या आमदारांना गाजराच्या माळा आणल्या होत्या. ‘गाजर देणं बंद करा, ओला दुष्काळ जाहीर करा’, अशी घोषणाबाजी मविआने केली. हे सगळे सुरु असताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर आले. दोन्ही बाजूचे आमदार आक्रमक असल्यामुळे बाचाबाचीचा प्रकार घडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी हे रागाच्या भरात सत्ताधारी आमदारांच्या अंगावर धावून जाताना दिसत होते. त्यामुळे विधिमंडळाच्या परिसरात प्रचंड गदारोळ माजला होता. अखेर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मध्ये पडत विरोधी पक्षाच्या आमदारांना बाजूला नेले. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या चार दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केलेल्या घोषणाबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ‘आले रे आले गद्दार आले’, ‘५० खोक्के एकदम ओक्के’, ‘गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो चले गुवाहाटी’, अशा एकापेक्षा एक झोंबणाऱ्या घोषणांनी महाविकास आघाडीने शिंदे गट आणि भाजपला जेरीस आणले होते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी होताना दिसत होते. त्यामुळे आता अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी भाजप-शिंदे गटाने आपली रणनीती बदलल्याचे दिसत आहेत.

महाविकास आघाडीच्या आमदारांप्रमाणेच बुधवारी भाजपचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ठिय्या देऊन बसले होते. या आमदारांनी महाविकास आघाडीच्या ‘५० खोके-ओक्के’ला चोख प्रत्युत्तर दिले. भाजपच्या या आमदारांकडून बॅनर्स झळकावण्यात आले. यावेळी भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनीही अनेक घोषण दिल्या. ‘बीएमसीचे खोके, मातोश्रीचे ओके’, ‘स्थायी समितीचे खोके, मातोश्री ओके’, ‘सचिन वाझेचे खोके, मातोश्री ओके’, अशा घोषणांनी सत्ताधाऱ्यांनी हा परिसर दणाणून सोडला होता.

विधान भवनाच्या पायऱ्यांवर राडा झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे तक्रार केली आहे. सुरुवातीला महेश शिंदे यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार अमोल मिटकरी यांनी केली आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर अमोल मिटकरी आणि महेश शिंदे एकमेकांमध्ये भिडले होते. मिटकरी यांनी सत्ताधारी आमदारांनी धमकावलं असल्याचं देखील म्हटलं आहे.

या गोंधळाच्या काहीच मिनिटं आधी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, 50 खोके, एकदम ओक्के ही घोषणा त्यांना एवढी जिव्हारी लागली की ते नाराज झालेले दिसत आहेत. यामुळंच त्यांच्यातील काही आमदार आज विधिमंडळातील पायऱ्यांवर आलेत. त्यांच्या या वागण्यानं हे निष्पन्न झालं आहे की, त्यांच्या विरोधात दिलेल्या घोषणा त्यांच्या मनाला लागल्या आहेत, असं अजित पवार म्हणाले.

हा गोंधळ घडला त्यावेळी तिथं उपस्थित असणारे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले की, आमच्यावर विरोधक आरोप करत होते. आता आम्ही त्यांच्या भ्रष्टाचारावर आवाज उठवण्यासाठी पायऱ्यावर आंदोलन केलं. आम्ही कुणाला पाय लावत नाही. आम्हाला कुणी पाय लावत असेल तर आम्ही सोडणार नाही. कुणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ, असं ते म्हणाले. आम्ही कुणाच्या आत जात नाहीत, आमच्या आत कुणी येऊ नये, असं गोगावले म्हणाले. आमच्या मार्गात आलं तर आम्ही सोडणार नाही, असं ते म्हणाले. त्यांनी आम्हाला धक्काबुक्की नाही केली, आम्ही त्यांना धक्काबुक्की केली, असंही गोगावले म्हणाले. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आम्ही डरफोक नाहीत, असं ते म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading